आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फडणीस उद्योग समूह कन्फेक्शनरी व्यवसायात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आदरातिथ्य, आयंटीईएस या सर्व व्यवसायात जम बसवल्यानंतर पुण्यातील फडणीस समूहाने आता कन्फेक्शनरी व्यवसायात प्रवेश केला आहे. पोर्तुगालमधील डॅन केक कंपनीबरोबर संयुक्त सहकार्य करार करून या कंपनीची बेकरी उत्पादने या वर्षाअखेरपर्यंत बाजारात आणण्याचा कंपनीचा विचार आहे.


डॅन केक आणि फडणीस ग्रूप यांच्या संयुक्त सहकार्यातून 'डॅनेसिटा फडणीस फूड इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या नवीन कंपनीमध्ये डॅन केक पोर्तुगालचे ६६ टक्के तर फडणस समुहाचे ३४ टक्के भागभांडवल असेल. या संयुक्त सहकार्यातून देशभरात 'डॅनिसिटा' या ब्रॅंड नावाने केक, बिस्किटे आणि अन्य बेकरी उत्पादने बाजारात आणण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात खोपोली येथे १oo कोटी रुपयांची गुंतवणूक करून प्रकल्प उभारण्यात येणार असून वर्षाला १५ हजार टन उत्पादनांची निर्मिती करण्याचा मानस फडणीस समुहाचे अध्यक्ष विनय फडणीस यांनी सांगितले. डॅन केकच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष कांतिलाल जमनादास यांनी, डॅनिसिटा ब्रॅँड अंतर्गत कुकीज, बटर कुकीज, स्विस रोल केक अशी अन्य देशात लोकप्रिय झालेली उत्पादने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. भारताच्या आसपासच्या भागातही ही उत्पादने निर्यात करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.