आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाच्या घसरणीने शेअर बाजाराला उतरती कळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही महिन्यांपासून आंतरराष्‍ट्रीय चलनी बाजारात भारतीय रुपयाचे मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन झाले आहे. यामागे प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्थेमधील चालू खात्यातील तफावत, विविध क्षेत्रातील उत्पादनांची मंदावलेली मागणी, विदेशी गुंतवणूकदारांनी फिरवलेली पाठ ही कारणे आहेत.


सोन्या-चांदीच्या आयातीमध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार भारत आणि चीन हे दोन देश जगातील 60 टक्के सोने खरेदी करतात. या खरेदीकरिता लागणारा पैसा हा अमेरिकन डॉलरच्या रूपात देण्यात येतो. चीनमध्ये सोन्याच्या खाणी असल्याने त्यांना घरगुती बाजारातून सोन्याची उपलब्धी होते. परंतु भारतात लागणारी जवळपास सगळी सोन्याची मागणी आयात करून भागवावी लागते. यामुळे रुपयाच्या मूल्यांकनावर दबाव येतो व रुपयाची पत घसरते.


सतत बारा वर्षे भाववाढ झाल्यानंतर या वर्षी सोन्याच्या किमतीत 20 टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. परंतु याचा भारतीय बाजारातील खरेदीवर काही फरक पडला नाही. उलट सोने स्वस्त झाल्याने ग्राहकांनी साठवण करण्याकरिता सोन्यामधील गुंतवणूक वाढली व या वर्षी ही गुंतवणूक 1 हजार टनांचा आकडा पार करण्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने वर्तवली आहे. मागील वर्षी हा आकडा 832 टन होता. केंद्र शासनाने सोन्याची मागणी 850 टनांपर्यंत असावी व चालू खात्यातील तफावत कमी होण्याकरिता या आठवड्यात सोने, चांदी, प्लॅटिनम या मौल्यवान धातूंवरील आयात कर 10 टक्क्यांपर्यंत केला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होईल आणि रुपयाची पत सुधारेल, असा अंदाज केंद्र सरकारला आहे. परंतु यामुळे सोन्याची किंमत भारतात वाढत आहे. या आठवड्यात सोने जवळपास 31000 रुपये प्रतितोळा भावापर्यंत पोहोचले. त्यासोबतच रुपयाची पत सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही धोरणांची घोषणा केली. भारतीय व्यक्तीला पूर्वी दोन लाख अमेरिकी डॉलर वर्षभरात भारताबाहेर घेऊन जाण्याची मुभा होती. ती आता 75000 अमेरिकन डॉलर एवढी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, भारतीय व्यक्तींना परदेशात मालमत्ता घेण्यावर रोख लावण्यात आली आहे. या पावलामुळे परकीय चलन भारतीय अर्थव्यवस्थेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर आळा बसेल व रुपयाचे मूल्यांकन वाढेल, अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेला आहे. त्याचबरोबर सोन्याच्या विटा आणि नाण्याच्या आयातीवर बंदी आणली आहे. परंतु शुक्रवारच्या सत्रात शेअर (सेन्सेक्स) बाजारात 750 अंकांची घसरण झाली. सोने-चांदी अनुक्रमे रु. 31,000 प्रति तोळा व 50,000 प्रतिकिलोच्या किमतीवर पोहोचले. यामुळे पुन्हा रुपयावर घसरण्याची वेळ आली आणि 62 रुपये प्रतिडॉलरपर्यंत रुपया गडगडला. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत विश्वास निर्माण करण्यासाठी आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारला आणखी पावले उचलण्याची सक्त गरज आहे. अन्यथा रुपया आणखी घसरण्याची व विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेण्याची शक्यता आहे.


chaitanyavwangikar@gmail.com