आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या शहरांमध्येही फास्टफूडचा व्यवसाय जोरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील फास्टफूडचा व्यवसाय जोमात असून सध्या 3 हजार 400 कोटी रुपयांचा हा व्यवसाय येत्या तीन वर्षांत 7 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता क्रिसिलच्या अहवालात सांगण्यात आले आहे. देशात आर्थिक मंदी असून देखील विकासाच्या बाबतीत क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) क्षेत्राने आघाडी घेतली आहे. देशभरात नवे क्यूएसआर स्टोअर सुरू झाल्यामुळे वर्तमान व्यवसाय पुढील काही वर्षांत दुप्पट होण्याची शक्यता असल्याचे क्रिसिलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्या देशात फक्त 25 टक्के फास्टफूड दुकानेच छोट्या शहरांमध्ये आहेत, परंतु येत्या तीन वर्षांत त्यांची संख्या 40 ते 45 टक्के होईल. देशातील एकूण क्यूएसआर मार्केटमध्ये जागतिक ब्रँड्सची 63 टक्के भागीदारी आहे आणि लहान शहरातील विस्तारामुळे भागीदारीत वाढच होत आहे. किमतीच्या दृष्टिकोनातून बघितल्यास क्यूएसआर मार्केटमध्ये पिझ्झा, बर्गर आणि सँडविच यांची सर्वाधिक 83 टक्के मागणी आहे. मॅकडोनाल्ड्स आणि डोमिनोज पिझ्झाची वाढती मागणी भारतातील त्यांच्या क्रेझची प्रचिती देत असल्याचे क्रिसिलचे इंडस्ट्री रिसर्च डायरेक्टर अजय डिसूजा यांनी सांगितले. क्यूएसआरमध्ये खर्च करण्याच्या बाबतीत छोट्या शहरातील मध्यमवर्गीय कुटुंब पुढे असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.


हॉटेलिंग खर्चात वाढ
क्रिसिलचे वरिष्ठ संचालक प्रसाद कोपरकर यांच्या मते, मोठय़ा शहरात क्यूएसआरवर एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा खर्च 2015-16 पर्यंत सुमारे दीडपटीने वाढून वार्षिक 6 हजार रुपयांवर पोहोचेल. छोट्या शहरांतील क्यूएसआरमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबीय वार्षिक 1500 रुपयांपर्यंत खर्च करत आहे. लहान शहरांचा विकास वेगाने होईल आणि 2015-16 पर्यंत तेथील मध्यमवर्गीय कुटुंबीयांचा वार्षिक क्यूएसआर 3700 रुपयांवर पोहोचेल.