आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Favourable Atomosphere Shares Buying Expeeded Bull

अनुकूल वातावरणामुळे शेअर्स खरेदीचा बैल सुसाट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी आणखी काही जास्त सवलती देण्याचे दिलेले संकेत, रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर आणखी कमी होण्याची अपेक्षा आणि जागतिक शेअर बाजारातील चांगल्या वातावरणामुळे बाजारातील मरगळ पार झटकली गेली.उत्साह द्विगुणित झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमध्ये यंदाच्या वर्षातील 265 अंकांची सगळ्यात मोठी उसळी घेऊन गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला.

बाजारातील खरेदीच्या वातावरणात स्थावर मालमत्ता, धातू आणि बँकांच्या समभागांना तुफान मागणी येऊन सेन्सेक्सचा पारा 265.21 अंकांनी वर गेला आणि दिवसअखेर 19,143.17 अंकांच्या पातळीवर बंद झाला. या अगोदर 29 नोव्हेंबर रोजी सेन्सेक्सने 329 अंकांची उसळी घेतली होती. त्यानंतरची ही सेन्सेक्सची सर्वात मोठी झेप आहे. बाजारात आलेल्या तेजीमध्ये गुंतवणूकदारांची श्रीमंती एक लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या समभागांचे एकूण बाजारभांडवल 96 हजार कोटी रुपयांनी वाढून ते 65.85 लाख कोटी रुपयांवर गेले. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 85.75 अंकांनी वाढून 5784.25 अंकांच्या पातळीवर बंद झाला. रिटेल गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांची तुफान खरेदी झाली.

गेल्या आठवड्यापासून मरगळलेल्या बाजाराला लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्प आणि वित्त विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रत्यक्ष कराबाबत काही सकारात्मक उद्घोषणा करण्याची हमी चिदंबरम यांनी सोमवारी दिली होती. त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. त्याच्याच जोडीला आपापल्या अर्थव्यवस्थांना संजीवनी देण्यासाठी मध्यवर्ती बँका डोस देण्याच्या उपाययोजना कायम ठेवण्याची भूमिका कायम ठेवतील या अर्थमंत्र्यांच्या विधानामुळे आणखी बळकटी मिळाली. आशियाई शेअर बाजारातील तेजीनेही बाजारातील खरेदीचा जोर वाढवला.

सुगीचे दिवस येणार
आर्थिक वृद्धी आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणखी काही ठोस घोषणा करण्याचे संकेत वित्तमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे येणारे काही दिवस बाजारासाठी सकारात्मक ठरण्याचा अंदाज आयआयएफएलचे संशोधन प्रमुख अमर अंबानी यांनी व्यक्त केला. पुढील महिन्यात रिझर्व्ह बँक व्याजदर कपात करण्याच्या शक्यतेमुळे बँका आणि स्थावर मालमत्ता समभागांची चांगली खरेदी झाल्याचे बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल म्हणाले.
टॉप गेनर्स
स्टर्लाइट, हिंदाल्को, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, विप्रो, सिप्ला, मारुती सुझुकी, जिंदाल स्टील, टाटा स्टील, एल अँड टी, भारती एअरटेल, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, गेल इंडिया, रिलायन्स, स्टेट बँक, टाटा पॉवर, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस.

जगातही उत्साह
जगभरातील मध्यवर्ती बँका अर्थव्यवस्थांना बळकटी देण्यासाठी आपल्या उपाययोजना कायम ठेवण्याच्या आशेने आशियाई शेअर बाजारात तेजी आली. चीननेदेखील चांगल्या आर्थिक वाढीची नोंद केली. या सगळ्या गोष्टींचा बाजारावर चांगला परिणाम झाला.
टॉप लुझर्स
बजाज ऑटो, भेल, आयटीसी, एनटीपीसी.