आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूरसंचार क्षेत्रातील ‘एफडीआय’ उतरणीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक आर्थिक मंदी आणि देशातील अडचणीच्या धोरणात्मक वातावरणाचा दूरसंचार क्षेत्राला काहीसा फटका बसला आहे. परिणामी एप्रिल ते जानेवारी या कालावधीत दूरसंचार क्षेत्रातील विदेशी थेट गुंतवणूक घटून ती 93 दशलक्ष डॉलरवर आली आहे. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ही गुंतवणूक कमाल 100 दशलक्ष डॉलरपर्यंत गेली असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


दूरसंचार क्षेत्रातील रेडिओ पेजिंग, सेल्युलर मोबाइल आणि मूलभूत दूरसंचार सेवा क्षेत्रात एप्रिल ते जानेवारी या कालावधीत 1.99 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित झाली असल्याचे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन परिषदेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. दूरसंचार क्षेत्रात 2011- 12, 2010-11 आणि 2009-10 या वर्षांमध्ये अनुक्रमे 1.99 अब्ज डॉलर, 1.66 अब्ज डॉलर आणि 2.55 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. टूजी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षात दूरसंचार परवाने रद्द केल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी, अस्थिर धोरण यामुळे दूरसंचार क्षेत्रातील विदेशी थेट गुंतवणुकीच्या ओघावर परिणाम झाला आहे. दूरसंचार क्षेत्रातील वातावरण सध्या नकारात्मक आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीचे वातावरण सुधारण्याची तातडीने गरज आहे. त्याचबरोबर स्पेक्ट्रमचा खर्च कमी करणे आणि स्थिर धोरण राबवून गुंतवणुकीला चालना देण्याची गरज असल्याचे मत दूरसंचार उद्योगाचे प्रतिनिधित्व करणा-या ‘सीओएआय’ संस्थेचे महासंचालक राजन मॅथ्यू यांनी व्यक्त केले.
केवळ दूरसंचारच नाही तर देशात येणा-या एकूण विदेशी थेट गुंतवणुकीचा ओघ देखील एप्रिल ते जानेवारी या कालावधीत 39 टक्क्यांनी घटून तो 19.10 अब्ज डॉलरवर आला आहे.


विविध क्षेत्रात झालेली विदेशी थेट गुंतवणूक
सेवा : 4.66 अब्ज डॉलर, हॉटेल आणि पर्यटन : 3.19 अब्ज डॉलर, हवामान : 1.38 अब्ज डॉलर, बांधकाम : 1.20 अब्ज डॉलर, औषध 1 अब्ज डॉलर
देशनिहाय ‘एफडीआय’
मॉरिशस : 8.17 अब्ज डॉलर, जपान : 1.69 अब्ज डॉलर, सिंगापूर : 1.82 अब्ज डॉलर, नेदरलॅँड : 1.51 अब्ज डॉलर, ब्रिटन : 1.04 अब्ज डॉलर
‘एफडीआय’चा कल
2009 - 10 : 25.83 अब्ज डॉलर, 2010-11 : 19.42 अब्ज डॉलर, 2011 - 12 : 36.50 अब्ज डॉलर.