आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडरलची कपात, घसरणीची वरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अमेरिका फेडरल रिझर्व्हने आर्थिक मदतीचा हात आखडता घेत रोखे खरेदीत कपात करण्याचा निर्णय घेतला. त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आणि निधीचा झरा आटणार या धास्तीने गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावला. परिणामी सेन्सेक्स 149.05 अंकांनी घसरून 20,498.25 वर आला. निफ्टी 46.55 अंकांच्या घसरणीसह 6073.70 वर स्थिरावला. जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि जानेवारीतील वायदा सौद्यापूर्तीचे अखेरचे दिवस याचाही परिणाम बाजारावर दिसून आला.


सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 19 समभागांना विक्रीचा फटका बसला. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हे दिग्गज समभाग आपटले. टाटा मोटर्स आणि भारती एअरटेल या समभागांची चांगली खरेदी झाली. गुरुवारी सलग पाचव्या सत्रांत सेन्सेक्सची घसरण झाली. गेल्या पाच सत्रांत सेन्सेक्स 875 अंकांनी आपटला आहे. बाजारातील 13 क्षेत्रीय निर्देशांकांपैकी बँकिंग, रिअ‍ॅल्टी, मेटल आणि तेल व नैसर्गिक वायू निर्देशांकांनी आपटी खाल्ली. चीनच्या मॅन्युफॅक्चरिंग आकडेवारीत घसरण झाल्याचाही परिणाम बाजारावर दिसून आला. आशियातील हाँगकाँग, चीन, जपान आणि सिंगापूर बाजारात घसरण झाली. युरोपातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते.


टॉप लुझर्स : एसबीआय, हीरो मोटोकॉर्प, सेसा स्टरलाइट, हिंदाल्को, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक,मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, कोल इंडिया, ओएनजीसी, टाटा पॉवर, डॉ. रेड्डीज लॅब, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो
टॉप गेनर्स : टाटा मोटर्स, भारती एअरटेल, भेल, गेल इंडिया


फेडरल इफेक्ट - नेमके काय झाले
अमेरिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने दोन वर्षांपासून तेथील फेडरल रिझर्व्हने आर्थिक मदतीचे पॅकेज सुरू केले होते त्याला क्यू-3 असे नाव देण्यात आले होते. क्यू-3 अंतर्गत फेडरल रिझर्व्ह दर महिन्याला 85 हजार डॉलरचे रोखे खरेदीचा कार्यक्रम आखला होता. त्यात जानेवारीपासून कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता फेडरल रिझर्व्ह महिन्याला दहा अब्ज डॉलरची रोखे खरेदी कपात केली आहे.


रुपया घसरून 62.56 वर
अमेरिका फेडरल रिझर्व्हने रोखे खरेदीत कपात केल्याने
डॉलरला मागणी आल्याचा फटका गुरुवारी रुपयाला बसला.
डॉलरच्या तुलनेत रुपयाने 15 पैसे गमावत 62.56 ही पातळी गाठली.


सोने, चांदीला पुन्हा झळाळी
गेल्या दोन दिवसांतील घसरणीला ब्रेक देत मौल्यवान धातू गुरुवारी तेजीने चकाकले. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 240 रुपयांनी वाढून 30,600 झाले.