आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फियाटने दिला ‘एकला चलो रे’चा नारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मोटार वितरण आणि विक्रीसाठी टाटा मोटर्सबरोबरचा संयुक्त सहकार्य करार मोडीत काढल्यानंतर ‘फियाट’ने आता ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीने भविष्यात आपले स्वतंत्र विक्री जाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

टाटा मोटर्सबरोबर झालेल्या संयुक्त सहकार्याला अपेक्षित ते यश मिळू शकले नाही. परिणामी फियाट ऑटोमोबाइल इंडिया लिमिटेडने गेल्या वर्षी मे महिन्यात आपला सहा वर्षांचा विक्री आणि वितरण करार रद्द केला. आता कंपनी विक्री, वितरण, विपणन, विक्रीपश्चात सेवा यासह सर्व व्यावसायिक कामकाजाचे नियंत्रण स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा मोटर्स - फियाट संयुक्त सहकार्यातून आलेल्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले. यातून धडा घेत वाटचाल करताना फियाटने गेल्या वर्षभरात स्वत:ची जवळपास 51 विक्री वितरण केंद्रे स्थापन केली असून त्यामध्ये आणखी दुपटीने वाढ करण्यात येणार असल्याचा विश्वास अलीकडेच नव्याने नियुक्ती झालेले फियाट क्रिसलर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नागेश बसवनहली यांनी व्यक्त केला.

वाहन उद्योगातील मंदीच्या वातावरणातही आपल्या पुंटो आणि लिएना या दोन मोटारींच्या माध्यमातून एक टक्का बाजारहिस्सा काबीज करण्याचे लक्ष्य कंपनी गाठेल, असा विश्वास फियाट आॅटोमोबाइल इंडियाचे संचालक एन्रिकोे अ‍ॅन्टॅनॅसियो यांनी व्यक्त केला. त्याअगोदर 2011 मध्ये कंपनीने 0.7 टक्के बाजारहिश्शाची नोंद केली होती, परंतु त्यानंतरच्या वर्षात हा बाजारहिस्सा घसरून 0.5 टक्क्यांवर आला. टाटा मोटर्सबरोबरचा सहा वर्षांचे विपणन सहकार्य रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांमध्ये काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाली होती, परंतु एक टक्का बाजारहिश्शाची नोंद करणे अशक्य आहे, असे आपणास वाटत नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.