आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Private Banks Provided 15 Thousand Employment Within A Year

पाच खासगी बँकांकडून एक वर्षात 15 हजार जणांना नोकरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कर्मचा-यांचे जाळे विस्तारण्यामध्ये खासगी क्षेत्रातील बड्या बँकांनी आघाडी घेतली आहे; परंतु त्यातही आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांच्यासह पाच मोठ्या खासगी बँकांनी गेल्या आर्थिक वर्षात आपल्या कर्मचारी संख्याबळात 15 हजारपेक्षा जास्त कर्मचा-यांची भर घातली असल्याचे दिसून आले आहे.


कर्मचा-यांची संख्या वाढवल्यामुळे या कर्मचा-यांच्या उत्पादकतेत लक्षणीय सुधारणा होऊन त्याचा चांगला लाभ झाला असल्याचे आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, येस बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या वार्षिक कर्मचारी संख्याबळाचे करण्यात आलेल्या विश्लेषणावरून दिसून आले आहे. त्याच वेळी या पाच बँकांच्या कर्मचा-यांवरील वार्षिक खर्चातही वाढ झाली आहे. 31 मार्च 2013 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात या पाच बँकांचे कर्मचारी संख्याबळ एकूण 15,823 कर्मचा-यांनी वाढून ते जवळपास दोन लाख कर्मचा-यांवर गेले आहे.
खासगी क्षेत्रातील या पाच आघाडीच्या बँकांच्या संपूर्ण वर्षातील कर्मचारी खर्चातदेखील वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. या बँकांचे एकत्रित कर्मचारी संख्याबळ 31 मार्च 2013 अखेर 1,99,555 नोंद झाले आहे. या सर्व बँकांचा कर्मचा-यांवर एकूण 13 हजार कोटी खर्च मागील आर्थिक वर्षात झाला असून त्यामध्ये 1 हजार 700 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. कर्मचा-यांच्या संख्येत तसेच त्यांच्यावर झालेल्या खर्चामध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर आहे.


असे आहे कर्मचारी संख्याबळ
बँक कर्मचा-यांमधील वाढ एकूण
एचडीएफसी बँक 2,989 69,065
अ‍ॅक्सिस बँक 6,163 37,901
आयसीआयसीआय बँक 3,789 62,065


येस बँकेची आघाडी
या पाच खासगी बँकांचे प्रति कर्मचारी लाभाचे प्रमाणही वाढले असून त्यापैकी चार बँकांच्या प्रत्येक कर्मचा-यामागे मिळणा-या संबंधित व्यवसायात सुधारणा झाली आहे. केवळ अ‍ॅक्सिस बँकेच्या प्रति कर्मचा-याच्या मागे मिळणा-या व्यवसायाचे प्रमाण घसरले असून ते मागील आर्थिक वर्षातील 12.76 कोटी रुपयांवरून 12.15 कोटी रुपयांवर आले आहे. प्रत्येक कर्मचा-याच्या मागे मिळणारा नफा तसेच व्यवसायामध्ये येस बँक अग्रेसर रहिली आहे. कंपनीचा प्रति कर्मचारी नफा 21 लाख रुपयांवर गेला असून त्यापाठोपाठ अ‍ॅक्सिस बँक (15 लाख रु.), आयसीआयसीआय बँक (14 लाख रु.), एचडीएफसी बँक (10 लाख रु.), कोटक महिंद्रा बँक (10 लाख रु.) अशी क्रमवारी आहे.