आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईवर ‘रेडी टू ईट’चा पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टोमॅटो, कांदा, बटाटा, काकडी, फळे, भाजी... अवघी महागाई माझी... या सध्याच्या अवस्थेमुळे भाजी करावी तरी कोणती, या प्रश्नाने गृहिणींची झोप उडाली आहे. महिन्याचे बजेट कोलमडून टाकणार्‍या भाजीपाल्याच्या किमती कमी होण्याची सध्या तरी कोणतीच शाश्वती नसल्याचे अखेर ‘रेडी टू कुक’ आणि ‘रेडी टू ईट’चा आधार घेणे गृहिणींनी पसंत केले आहे.

अगदी साधी काकडी आणि कोथिंबीरही महागल्याने जेवण बनवायचे तरी कसे, असा गहन प्रश्न महिलांना पडला आहे. फळांची चव चाखावी तर तीही परवडण्याच्या पलीकडे गेल्याने मध्यम आणि निम्न मध्यमवर्गीयांची सध्या फारच कुचंबणा झाली आहे. जवळपास अशा 55 टक्के कुटुंबांनी तयार खाद्यपदार्थांना पसंती दिली असल्याचे ‘असोचेम’ ने अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.

यंदा पाऊस चांगला होत असल्यामुळे दिलासा मिळाला असला तरी वरुणराजाच्या अशा बरसण्याचा सध्या तरी तमाम गृहिणींना राग आला आहे. उत्तराखंडमधील जलप्रलयासह अन्य काही राज्यांमध्ये धुवाधार पडलेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच डिझेलच्या किमती वाढल्यामुळे मालवाहतुकीच्या किमती वाढण्याची भर पडली आहे. या सगळ्या गोष्टींमुळे शेतकर्‍याच्या जमिनीतून बाहेर पडलेला भाजीपाला, फळे डायनिंग टेबलवर येईपर्यंत त्यांच्या किमती जवळपास 300 टक्क्यांनी वाढत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद पुणे, चंदिगड, डेहराडून, बंगळुरू आणि अन्य काही शहरांमधील 500 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे झालेल्या महागाईमुळे कौटुंबिक बजेट आटोक्यात ठेवणे भाग पडत असल्याचे जवळपास 88 टक्के मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींनी सांगितले.

अहवालातील निरीक्षणे
०पावसाळी हंगामात येणारी वेगवेगळी फळे आणि भाजीपाला खरेदीला मुरड घालावी लागत असल्याचे सांगणारे
०फळे आणि भाजीपाल्यामुळे घरच्या जमाखर्चाची मिळवणी करणे जिकिरीचे झालेले मत व्यक्त करणार्‍या गृहिणी.
० केवळ भाजीपाल्यामुळे कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडण्याचे प्रमाण
० खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे जीवन जगणे कठीण झाल्याचे मत व्यक्त करणार.

वेतन आणि महागाई
गेल्या तीन वर्षांमध्ये सामान्य माणसाच्या वेतनात सरासरी 10 ते 15 टक्के वाढ झाली. परंतु भाजीपाल्याचे दरही त्यासोबत जवळपास 250 ते 300 टक्क्यांनी वाढले असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

खिशाला फटका
भाजीपाल्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून त्याचा सगळ्यात जास्त फटका सामान्यांच्या खिशाला बसला आहे. - डी. एस. रावत, महासचिव, असोचेम