आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा ज्वर उतरणीला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - फळे आणि भाजीपाला या प्रमुख जीवनावश्यक वस्तूंच्या किमती घसरल्यामुळे महागाई उतरणीला लागली आहे. नुकत्याच संपलेल्या एप्रिल महिन्यात महागाई घसरून 4.89 टक्क्यांच्या जवळपास साडेतीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आलेली असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महागाईचा भार हलका झाल्यामुळे व्याजदर आणखी कमी करण्याच्या दृष्टीनेही रिझर्व्ह बँकेला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.

गेल्या वर्षातल्या एप्रिल महिन्यात 7.50 टक्क्यांपर्यंत गेलेला घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर मार्च महिन्यात 5.96 टक्क्यांवर आला. त्या वेळी नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर 4.78 टक्के होता. सलग तिसर्‍या महिन्यात आणि विशेषकरून नोव्हेंबर 2009 नंतर महागाई प्रथमच इतक्या खालच्या पातळीवर आली आहे. रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेल्या सुसह्य पातळीमध्ये महागाई आता आहे.

सरकारने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार निर्मिती गटातील महागाईचे प्रमाण मार्च महिन्यातील 4.07 टक्क्यांवरून कमी होऊन 3.41 टक्क्यांवर आले आहे.त्याचप्रमाणे घाऊक किंमत निर्देशांकात 14.34 टक्के वाटा असलेल्या खाद्य वस्तूच्या महागाईचे प्रमाणदेखील लक्षणीय कमी होऊन ते मार्च महिन्यातील 8.73 टक्क्यांवरून 6.08 टक्क्यांवर आले आहे.

भाजीपाल्याच्या किमतीत लक्षणीय घट झाल्यामुळे अन्नधान्याची महागाई उतरण्यास मदत झाली आहे. परिणामी मार्च महिन्यात (-) 0.95 असलेली महागाई एप्रिल महिन्यात घसरून (-) 9.05 टक्क्यांवर आली आहे. भाजीपाल्याबरोबरच फळांच्या महागाईचे प्रमाणदेखील याच आढावा काळात घसरून ते 4.71 टक्क्यांवरून 0.71 टक्क्यांवर आले आहे. कांद्याचे भाव मात्र अजूनही रडवत असून एप्रिल महिन्यात या भावाने 91.69 टक्क्यांची उंची गाठली आहे. अगोदरच्या महिन्यात ती 94.85 टक्क्यांवर होती.

बाजाराला दर कपातीची आशा?
आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अगोदरच्या महिन्यात प्रमुख व्याजदरामध्ये पाव टक्क्याने कपात केली होती; परंतु त्या वेळी व्याजदर आणखी सुसह्य करण्यासाठी जास्त संधी नसल्याचे मध्यवर्ती बँकेने म्हटले होते. परंतु, गेले अनेक महिने चढ्या पातळीवर राहिल्यानंतर ग्राहक किमतीवर आधारित किरकोळ महागाईचा दर एप्रिल महिन्यात घसरून 9.39 अशा एकअंकी पातळीवर आला आहे. आता मुख्य महागाईदेखील कमी झाली आहे. त्यामुळे महागाईचा ताण हळूहळू कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे 17 जून रोजी जाहीर होणार्‍या मध्य तिमाही पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक या संकेतांची दखल घेईल, अशी आशा वाटत आहे.

सेन्सेक्स 31 अंकांनी वाढला
देशातील सर्वच शेअर बाजारांत मंगळवारी तेजीचा कल होता. सेन्सेक्समध्ये 30.62 अंकांची तेजी येत तो 19722.29 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 14.95 अंकांनी वाढून 5995.40 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील बँकिंग आणि हेल्थकेअर विभागातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली.

आरबीआयचे लक्ष
चलनवाढीवर आरबीआय बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे या आकडेवारीत काही नाट्यमय बदल झाल्यास पुढील नाणेनिधी आढाव्यामध्ये त्याचा विचार करण्यात येईल, असे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी म्हटले होते.
अरविंद मायाराम, सचिव, आर्थिक व्यवहार खाते.

दरकपातीची संधी
महागाई सुसह्य झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेला व्याजदर कमी करण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा वाव मिळाला आहे. मागील वर्षाच्या एप्रिल आणि यंदाच्या मे महिन्यात रेपो दर कमी झालेले असले तरी व्याजदर खर्‍या अर्थाने कमी झाले नाहीत. त्यामुळे व्याजदर आणखी कमी होण्याची गरज आहे. - नैना लाल किडवाई, अध्यक्ष, फिक्की.

महागाईच्या घसरणीचा कल असा
गहू 13.89 %, बटाटे - 2.42 %, तांदूळ 17.09, कडधान्ये 15.63, डाळी : 10.28 %, अंडी, मांस, मासे 10.44 %, दूध : 4.04 %, इंधन आणि विद्युत : 8.84 %.