नवी दिल्ली - मान्सूनची प्रगती खुंटल्याने देशात दुष्काळसदृश स्थिती असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कृषी मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कमी पावसामुळे खरिपाच्या पेरणीत 18 टक्के घट आली आहे. विशेष म्हणजे, एक ते 20 जून या काळात देशात सरासरीपेक्षा 39 टक्के कमी पाऊस झाला आहे. सरकारनेही पावसाचे हे प्रमाण लक्षात घेऊन त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळातही पावसाचे प्रमाण असेच राहिले तर खरीप हंगामातील पेरा आणखी घटण्याची शक्यता आहे. यामुळे तांदूळ, कापूस, सोयाबीन, मका, कडधान्यांचे उत्पादन घटून ते महागण्याची शक्यता आहे.
कृषी मंत्रालयाच्या मते, गुरुवारपर्यंत देशात 95 लाख 6 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील खरीप हंगामाच्या याच काळाच्या तुलनेत हा पेरा 18 टक्क्यांनी कमी आहे. 2013 च्या खरीप हंगामात या काळात 116.1 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा आतापर्यंत देशात 20 लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. गतवर्षी 19 जूनपर्यंत 28 लाख हेक्टर क्षेत्र कपाशीखाली आले होते. गतवर्षीच्या हंगामात 19 जूनपर्यंत एक लाख 54 हजार हेक्टर क्षेत्रावर तिळाची पेरणी झाली होती, यंदा आतापर्यंत 1 लाख 23 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कडधान्यांच्या बाबतीत गेल्या हंगामातील 3 लाख 16 हजार हेक्टरच्या तुलनेत गुरुवारपर्यंत 2 लाख 60 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.