आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Tax Saving Think The Equity Liquid Saving Scheme

करबचतीसाठी आता विचार करा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीमचा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) ही करबचतीसाठी एक पूर्णपणे सुरक्षित योजना आहे व यात सध्या 8.80 टक्के प्रतिवर्ष या दराने व्याज मिळते. हा व्याजाचा दर दरवर्षी निश्चित केला जातो व तो कमी-जास्त होत असतो, हे आपण बघितले. जर जोखीम घेण्याची तयारी असेल तर करबचतीसाठी म्युच्युअल फंडाच्या ईएलएसएस योजनांचा(इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीमचा) आपण विचार करू शकतो.ईएलएसएस हा म्युच्युअल फंडाचाच एक प्रकार आहे. आपण यात गुंतवलेली रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली जाते. त्यामुळे शेअर मार्केटमधील तेजी-मंदीप्रमाणे, तसेच फंडाने कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे; म्हणजे त्याचा पोर्टफोलिओ काय आहे, त्याप्रमाणे यातील गुंतवणुकीचे मूल्य वरखाली होत राहते. सर्वात महत्त्वाची, लक्षात घेण्याची बाब म्हणजे, ही म्युच्युअल फंडाची इक्विटी लिंक्ड योजना असल्याने यातील गुंतवणुकीवर किती लाभ मिळेल याची हमी नसते. यात गॅरंटीड रिटर्न मिळत नाहीत. दीर्घ कालावधीत या योजनेतून उत्तम लाभ मिळू शकतो, पण अशी हमी दिली जात नाही. या ईएलएसएस योजनेविषयी माहिती घेऊ.

गुंतवणुकीवर सेक्शन 80
सी खाली सूट मिळते.

सेक्शन 80-सी खाली जी आपण एक लाख रुपयापर्यंत दरवर्षी सूट घेऊ शकतो. त्यातच ईएलएसएसमधील गुंतवणुकीचा समावेश होतो. आपण या ईएलएसएस म्युच्युअल फंडात कितीही रक्कम गुंतवू शकतो, पण सूट मात्र फक्त एक लाख रुपयांपर्यंतच मिळते. यातील गुंतवणुकीला तीन वर्षांचा लॉक-इन पीरिएड असतो. पण तीन वर्षांनंतर लगेच रक्कम काढून घेण्याची घाई करू नये. यातील आपल्या गुंतवणुकीचे मूल्य किती झाले आहे, शेअर मार्केट खूप खाली आहे का, आणखी काही काळाने यातील गुंतवणुकीचे मूल्य वाढेल का, असा सर्व विचार करून मग निर्णय घ्यावा. डिव्हिडंड ऑ प्शन म्हणजे म्युच्युअल फंड वेळोवेळी जाहीर करेल त्या प्रमाणात व त्या वेळी आपल्याला लाभांश मिळतो. उलट ग्रोथ ऑ प्शन म्हणजे आपल्या गुंतवणुकीचे मूल्य वाढत राहते व आपण रक्कम काढून घेऊ तेव्हा या वाढलेल्या मूल्याप्रमाणे रक्कम हातात येते. बँकेत मुदत ठेवीत पैसे गुंतवल्यावर जसे आपण दर सहामाही किंवा दरवर्षी व्याज घेऊ शकतो व मुदतीअंती मुद्दल रक्कम परत घेऊ शकतो किंवा क्युमुलेटिव्ह पद्धतीने एकदम मुदतीअंती जास्त रक्कम घेऊ शकतो. समजा, आपण जानेवारी 2013 मध्ये या योजनेत गुंतवणूक केली व मार्च 2013 मध्ये यावर लाभांश मिळाला, तर ती रक्कम आपण एप्रिल 2013 मध्ये पुन्हा ईएलएसएस योजनेत गुंतवून 2013-14 या वित्तवर्षासाठीही करबचतीचा फायदा घेऊ शकतो.

म्युच्युअल फंडाच्या ऑ फिसमध्ये जाऊन गुंतवणूक करू शकतो
म्युच्युअल फंडाच्या ऑ फिसमध्ये जाऊन स्वत: गुंतवणूक करू शकतो.आपण स्वत: थेट गुंतवणूक केली तर सल्लागाराची फी किंवा त्यांना मिळणारे ट्रेल कमिशन हा खर्च वाचू शकतो. तसेच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सुरुवातीला एकदाच केवायसी प्रोसिजर पूर्ण करावी लागते. केवायसी म्हणजे नो युवर कस्टमर. या ईएलएसएस योजना ओपन एंडेड प्रकारातील असतात. म्हणजे यात कोणत्याही दिवशी गुंतवणूक करता येते व तीन वर्षांच्या लॉक इन नंतर कधीही पैसे काढता येतात. गुंतवणूक करताना सुरुवातीला 500 रुपये गुंतवून नंतर आपण वाढवत नेऊ शकतो. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारेही यात गुंतवणूक करू शकतो. एचडीएफसी, कॅनरा रोबेको, आयसीआयसीआय, फ्रँकलिन टेम्पलटन इत्यादी अनेक म्युच्युअल फंडांच्या ईएलएसएस योजना असतात. स्वत: अभ्यास करून किंवा गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन त्यापैकी कोणती योजना निवडायची ते ठरवू शकता. रक्कम मोठी असेल तर डायव्हर्सिफिकेशन म्हणून दोन योजनांचीही निवड करू शकता. तेव्हा जोखीम घेण्याची तयारी असेल तर करबचतीसाठी इएलएसएस योजनांचा नक्कीच विचार करावा.

kuluday@rediffmail.com