आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्डने बनवली सर्वसामान्यांसाठी किफायती कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1903 मध्ये स्वत:च्या नावाने कंपनी सुरू करणार्‍या फोर्डने 1908 मध्ये तो इतिहास रचला, ज्यामुळे सर्वसामान्य अमेरिकी आणि जगातील इतर लोकांसाठीही प्रवासाचा नवा मार्ग खुला झाला. फोर्डचे स्वप्न होते, एक अशी कार बनवणे, जी एका परिवाराच्या दृष्टीने कोठी असावी; मात्र ती चालवणे व तिची देखभाल करणे सोपे असावे. ती एवढी स्वस्त असावी की, सामान्य कमाई असलेली व्यक्तीही ती खरेदी करू शकेल. अशा कारचे डिझाइन, मटेरियल आणि रंग आदी बाबी निश्चित करण्यात त्यांनी दोन वर्षे घालवली. 1 ऑक्टोबर 1908 रोजी तो दिवस उजाडला, जेव्हा अशी कार विक्रीसाठी तयार झाली. तिचे नाव होते मॉडेल-टी. तिने लोकांचे लक्ष असे वेधले की,त्वरित 10,000 कारची बुकिंग झाली. त्या वेळी एखाद्या उत्पादनाची दोन-चार हजारांची बुकिंग होणे मोठी गोष्ट मानली जायची.

ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीकडे वेगाने कार बनवण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. 1913 मध्ये त्यांना याचा मार्ग सापडला. तो होता असेंब्ली लाइन, त्याद्वारे कार एका ट्रॅकवर तयार होत होती. ही पद्धत सुरू करणारे फोर्ड पहिले व्यक्ती होते. या पद्धतीला फोर्डिंग्ज म्हटले जाऊ लागले. या पद्धतीने एक कार केवळ 93 मिनिटांत संपूर्णपणे असेंब्ल्ड केली जात होती. त्याच वेळी त्या काळातील इतर कंपन्यांना कार बनवण्यासाठी याच्या आठपट अधिक वेळ लागत होता. ही पद्धत एवढी प्रभावी ठरली की, फोर्ड कंपनी एका वर्षात 1,68,000 कार बनवू लागली.

मॉडेल-टी ही चार सीटर कार होती. त्या वेळी दोन सिटांच्या ओपन कार बनवण्यात येत असत. त्यांना आज स्पोटर््स कार म्हटले जाते. पीपल्स कार हाताळणे एवढे सोपे होते की, सामान्य व्यक्तीही तिला सहज चालवू शकत होती.तिचे इंजिन 20 हॉर्सपॉवरचे होते आणि वेग 62 ते 72 किमी प्रती तास होता. इंधनाचा खप 40 ते 48 किमी प्रतिगॅलन एवढा होता. त्याच वेळी इतर कार प्रतिगॅलन इंधनात केवळ 20 ते 32 किमी जात असत. सुरुवातीला ही कार एका हॅँडलने सुरू केली जात असे, नंतर तिला इलेक्ट्रिक स्टार्टर बसवण्यात आले. तिला क्लच नव्हते, तर गिअर फूट पॅडलने बदलण्यात येत असत. मॉडेल-टी कार पारंपरिक कारपेक्षा वेगळी होती.

जेव्हा ही कार प्रथम बाजारात आली तेव्हा तिची किंमत 850 डॉलर्स होती. (आज 20,700 डॉलर्स आहे) आजही आपल्या स्पर्धक कार्सच्या तुलनेत निम्म्याने ती स्वस्त आहे. विक्री अधिक होत असल्याने कंपनी सातत्याने तिची किंमत वेळोवेळी कमी करीत राहिली. 1912 मध्ये ती 575 डॉलर्सला विकली जात होती, या कारची किंमत एका अमेरिकन वर्करच्या सरासरी वेतनापेक्षा कमी होती. एक वेळ अशी होती की, तिची किंमत 280 डॉलर्सपर्यंत खाली आली होती. 26 मे 1927 ला जेव्हा तिचे उत्पादन बंद करण्यात आले तोपर्यंत तिची विक्री एक कोटी 50 लाखांपर्यंत पोहोचली होती. टाटाची नॅनो कार आली तेव्हा तिला सामान्यांची कार म्हटले गेले, पण फोर्डने तशी कार 100 वर्षांपूर्वीच बनवली होती.
(पुस्तक: 50 कंपनीज् दॅट चेंज द वर्ल्ड, प्रकाशक: जॅको)