आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून निधीचा ओघ सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून (एफआयआय) पुन्हा भांडवली निधीचा ओघ सुरू झाला आहे. मागील वर्षात रोखे विक्रीवर भर दिल्यानंतर या गुंतवणूकदारांनी नवीन वर्षात आतापर्यंत जवळपास 16 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.
अमेरिकेतील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी 85 अब्ज डॉलरचा मासिक रोखे खरेदी कार्यक्रम आवरता घेण्याचा निर्णय फेडरल रिझर्व्हने घेतला होता. यामुळे उगवत्या बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असलेला निधी कमी होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवल बाजारात निधीचा ओघ आणण्यात हात आखडता घेतला होता.
फेडरल रिझर्व्हने जानेवारी महिन्यापासून रोखे खरेदी कार्यक्रमात कपात करून तो 85 अब्ज डॉलरवरून 75 अब्ज डॉलरवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भांडवल बाजारात पुन्हा निधीचा ओघ सुरू झाला आहे. चलन बाजार तसेच व्याजदरात काही प्रमाणात स्थिरता येऊ लागली असल्याने कर्ज बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून पुन्हा निधीचा ओघ येऊ लागला असल्याचे मत भांडवल बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 17 जानेवारीपर्यंत 22,937 कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांची ढोबळ खरेदी केली, तर 6,785 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री केली. परिणामी या गुंतवणूकदारांकडून भांडवल बाजारात 16,152 कोटी रुपयांच्या निधीचा ओघ आल्याचे बाजार नियंत्रक ‘सेबी’ची आकडेवारी सांगते.
एफआयआय 1726 वर :
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 2,148 कोटी रुपयांची गुंतवणूक समभाग बाजारपेठेत केली. कर्ज आणि समभाग या दोन्ही बाजारपेठेत एकूण 18,300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मागील वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी रोखे बाजारपेठेतून 50.847 कोटी रुपयांची निव्वळ रक्कम काढून घेतली, तर समभाग बाजारपेठेत त्यांनी 1.13 लाख कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली. यंदाच्या 17 जानेवारीपर्यंत देशातील नोंदणीकृत विदेशी गुंतवणूकदारांची संख्या 1,726 वर गेली आहे.