आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी गुंतवणुकीची गंगा आली अंगणी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी नुकत्यातच संपलेल्या आर्थिक वर्षात भारतीय शेअर बाजारात जवळपास 1.4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे या गुंतवणूकदारांनी देशात गुंतवणुकीची गंगा आणण्यास सुरुवात केल्यापासून आजपर्यंतची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. बाजार नियंत्रक सेबीकडे उपलब्ध
असलेल्या आकडेवारीनुसार 31 मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात या गुंतवणूकदारांनी एकूण 1,39,408 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
या गुंतवणूकदारांनी 1992- 93 मध्ये भांडवल बाजारात प्रवेश केल्यानंतरची एखाद्या एकट्या आर्थिक वर्षातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. 1992 - 93 मध्ये या गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारात 13 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
खास गोष्ट म्हणजे या गुंतवणूकदारांनी केवळ तीनवेळा एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. 2009-10 आणि 2010 -11 या वर्षात अनुक्रमे 1,10,221 कोटी रुपये आणि 1,10,121 कोटी रुपये आणि आता नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात अशा तीनवेळा त्यांच्या गुंतवणुकीचा जोर सर्वाधिक होता.
केवळ समभाग बाजारपेठेत नाही, तर कर्ज बाजारपेठेतदेखील या गुंतवणूकदारांनी मागील आर्थिक वर्षात 28,334 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
भारतीय भांडवल बाजारपेठ खुली झाल्यापासून या गुंतवणूकदारांनी समभाग बाजारपेठेत 6.3 लाख कोटी रुपये, तर कर्ज बाजारपेठेत 1.68 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या आर्थिक वर्षाच्या गेल्या काही महिन्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून होणार्‍या गुंतवणुकीचा वेग वाढला असून त्यांनी तीन महिन्यांत 55 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे; परंतु 2011-12 या वर्षात मात्र एफआयआयने केवळ 47,935 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

सरकारचे सकारात्मक पाऊल
विदेशी गुंतवणूकदार संस्थांना आकर्षित करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या सकारात्मक उपाययोजना, आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक सुधारणांना दिलेली गती, युरोपातील आर्थिक पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर भारतासारख्या उगवत्या बाजारपेठेचा चांगला पर्याय विदेशी गुंतवणूकदारांना मिळाला आहे.