आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreign Investment Institution News In Marathi, Business, Divya Marathi

विदेशी संस्थांचा एफएमसीजी समभागांतून काढता पाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) जानेवारी ते मार्च या कालावधीत कोलगेट, डाबर, इमामी यासारख्या काही एफएमसीजी कंपन्यांमधील व्यवहार कमी केले आहेत. दुसर्‍या बाजूला स्थानिक विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मात्र एफएमसीजी कंपन्यांमधील समभागांची खरेदी केली असल्याचे चोक्सी ब्रोकर्सच्या अहवालात आढळून आले.

ए.सी. चोक्सी शेअर ब्रोकर्स कंपनीने केलेल्या एका अहवालामध्ये करण्यात आलेल्या 16 एफएमसीजी कंपन्यांचे विश्लेषण केले असता 30 मार्चअखेर संपलेल्या तीन महिन्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 11 कंपन्यांमधील हिस्सा कमी केला आहे. अन्य चार कंपन्यांमधील विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा हिस्सा वाढला असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत आयटीसी कंपनीमधील या गुंतवणूकदारांचे भांडवलाचे प्रमाण कायम राहिले आहे.

एफएमसीजी कंपन्याचे मूल्य तुलनेत खर्चिक झाल्याने एफआयआयची या कंपन्यांवरील माया आटली असल्याचे मत विदेशी गुंतवणूक तज्ज्ञांनी व्यक्त केले. आता एफआयआयनी गोदरेज कंझ्युमर, एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स, युनायटेड स्पिरिट, झायडस वेलनेस, मारिको, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांत गुंतवणुकीला प्राधान्य दिले असल्याचे अहवालात म्हटले आहे. याउलट विदेशी गुंतवणूकदारांनी बजाज कॉर्प., नेस्ले, ज्योती लॅबोरेटरीज आणि ब्रिटानिया या कंपन्यांतील गुंतवणूक काढून घेतली आहे.

अहवालानुसार, ग्राहकोपयोगी कंपन्यांतून विदेशी गुंतवणूकदार काढता पाय घेत असताना देशी गुंतवणूकदार मात्र याच कंपन्यांत गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ बनवणार्‍या कंपन्यांत विदेशी गुंतवणूकदारांना जास्त रस असल्याचे चित्र आहे.