आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreign Investors Invest More Money, Crossed One Crores Lack Phase

विदेशी गुंतवणूकदारांचे भरभरून माप,ओलांडला लाख कोटीचा टप्पा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विदेशी गुंतवणूकदारांच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा यंदाच्या वर्षात आतापर्यंत ओलांडला आहे. विधानसभा निवडणुकांनंतर केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार येण्याची शक्यता आणखी वाढली आहे. त्यामुळे हा निधीचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
शेअर बाजारातील महत्त्वाचा घटक असलेल्या विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) 6 डिसेंबरपर्यंत 7,46,334 कोटी रुपयांची ढोबळ समभाग खरेदी केली तर 6,45,757 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. त्यामुळे या गुंतवणूकदारांकडून एकूण 1,00,577 कोटी रुपयांचा निधी भांडवल बाजारात आल्याचे बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या आकडेवारीत म्हटले आहे.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 1992-93 मध्ये भांडवल बाजारात प्रवेश केल्यापासून 2010 आणि 2012 या दोन वर्षातच फक्त त्यांची गुंतवणूक 1 लाख कोटी रुपयांच्या वर गेली. या गुंतवणूकदारांनी गेल्या वर्षात 1,28,360 कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक केली तर 2010 या वर्षात 1,33,266 कोटी रुपयांचा निधी बाजारात आला होता. आर्थिक वृद्धीला चालना तसेच रुपयाला बळकटी देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केलेल्या विविध उपाययोजनांचा परिणाम म्हणून गेल्या तीन महिन्यांत भांडवल बाजारात जवळपास 37 हजार कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. दुस-या बाजूला कर्ज बाजारपेठेतून विदेशी गुंतवणूकदारांनी यंदाच्या वर्षात आतापर्यंत 55,075 कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच विदेशी गुंतवणूकदार भांडवल बाजारात सकारात्मक असून त्यांची ही भूमिका मे महिन्यापर्यंत तशीच कायम राहील. परंतु नंतर मात्र त्यांच्या गुंतवणुकीचा वेग काहीसा मंदावण्याचा अंदाजही काही जणांनी व्यक्त केला.
बाजाराची नजर भाजपवर
बाजारातील विश्लेषकांच्या मते, विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. त्यामुळे पुढील वर्षात होणा-या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला केंद्रात सत्तेवर येण्याची चांगली संधी आहे. पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून नरेंद्र मोदी यांचे स्थान आणखी भक्कम झाले आहे. या सगळ्या घडामोडी बघता येणा-या काही महिन्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून येणारा निधीचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे.