आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ‘Forgery’ Row: Mirach Warns Subrata Roy’s Sahara, Says Apologise Or Pay $13 Mn In Compensation

माफी मागा, अन्यथा ८० कोटींची भरपाई द्या, 'मीराच'चा सहाराला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - भारतीय वंशाचे नागरिक सारांश शर्मा यांच्या अमेरिकन कंपनी मीराच कॅपिटलने सहारा इंडिया उद्योग समूहावर त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप केला आहे. त्यासाठी सहारा समूहाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी मीराचने केली असून माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईची धमकी कंपनीने दिली आहे. त्याच बरोबर कराराचे उल्लंघन केल्याबद्दल नुकसान भरपाई म्हणून मीराचने सहारा समूहाकडे १.३ कोटी डॉलरची (जवळपास ८० कोटी रुपये) मागणी केली आहे. यामुळे सहारा समूहापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सहारा आणि मीराच समूहादरम्यान न्यूयॉर्कचे दोन व लंडन येथील एका हॉटेल विक्रीचा करार झाला होता. गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी सहाराप्रमुख सुब्रत रॉय जवळपास वर्षभरापासून तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाने १० हजार कोटी रुपये जमा करण्याची अट ठेवली आहे. ही रक्कम जमा करणे सहारा समूहाला अद्याप जमलेले नाही. या रकमेसाठीच सहाराने त्यांची हॉटेल विक्रीला काढली होती. सारांश शर्मा यांनी सांगितले की त्यांची कंपनी सहारा समूहासाठी अजूनही १२ हजार कोटी रुपये जमवू शकते. शर्मा यांनी सहाराचे तिन्ही हॉटेल खरेदी करण्याचा प्रस्ताव मीराचने सहाराला दिला होता. तिसरा पर्याय पैसे परत देण्याचा होता. सारांश यांच मते सहारा समूह जर माफी मागून व आरोप मागे घेत असेल तर २६ लाख डॉलर(सरासरी १६ कोटी रुपये) कंपनी परत करायला तयार आहे.

सहाराने गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयात बँक ऑफ अमेरिकेच्या वतीने जारी केलेले एक पत्र सादर केले होते. त्यात म्हटले होते की मीराचच्या खात्यावर सहाराला देण्यासाठी १.०५ अब्ज डॉलर आहेत. बँक ऑफ अमेरिकेने नंतर ही बाब नाकारली होती. त्यावर सहाराने मीराच कंपनीवर फसवणुकीचा आरोप करत अमेरिकन कंपनीवर खटला भरण्याचा इशारा दिला होता. या पत्राबाबत शर्मांनी सांगितले की, मीराच कंपनी बनावट पत्र सादर करू शकत नाही हे आम्ही जाणतो. कारण बँकेच्या वकिलांकरवीच हे पत्र थेट सहारा समूहाला पाठवण्यात आले होते.

सरकार विकणार संपत्ती?
सेबीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, जर हॉटेल विकण्याचा करार पूर्ण झाला नाही तर सरकार सहारा समूहाची संपत्ती ताब्यात घेऊ शकते. ही संपत्ती विकून त्यातून रक्कम काढून घेऊ शकते.