आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय विदेशी विनिमय आणि रुपयाचे अवमुल्यन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदेशी विनिमयाबद्दल जनसामान्यांत रहस्यमय वातावरण असते. त्यात अनेक गोष्टी, मुद्दे असतात. विदेशी विनिमय (फॉरेन एक्स्चेंज रिझर्व्ह) ही खूप रहस्यमय किंवा फक्त अर्थतज्ज्ञांना कळणारी गोष्ट आहे असे काही नाही. सध्या सगळीकडेच रुपया व त्याचे अवमूल्यन ही चर्चेची बाब झाली आहे. त्यात आता आम आदमीसुद्धा आपल्या परीने मत मांडत आहे. याकडे पाहण्याचा दृष्टिकोन व समज या दोन गोष्टींचा आपल्याकडे अभाव आहे असे दिसते. एफईआर म्हणजे एका देशाच्या केंद्रीय बँकेने दुसºया देशाच्या चलनात ठेवलेल्या ठेवी आणि बाँड्स. एफईआरचे विभाजन परकीय चलन, सोन, एसडीआर (स्पेशल ड्रॉइंग राइट्स) आणि आयएमएफ (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड-आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) मधील मुद्राकोश स्थिती या चार गोष्टीत होते.
जगातील अधिकतर देश मुख्यत्वेकरून अमेरिकन डॉलर हेच विदेशी विनिमयाच्या साठ्यासाठी परकीय चलन म्हणून वापरतात. विदेशीय विनिमयाच्या साठ्यामुळे देश विनिमय दर आणि आयात-निर्यात या गोष्टीवर प्रभाव पडतो. दुसºया महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली. त्याअंतर्गत विदेशी विनिमय हे साधन राष्ट्र व त्यांच्या केंद्रीय बँकांनी आपापल्या मुद्रेचे मूल्यांकन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिर राहावे म्हणून उपयोग केला. या प्रणालीचे नाव ‘ब्रेटन वुड्स सिस्टिम’ असे होते. पण एका काळानंतर या प्रणालीचा पाडाव झाला आणि सर्वांचा विदेशी विनिमयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर व सद्य:स्थितीला हे साठे आंतरराष्ट्रीय कर्जाची परतफेड, दोन्ही सरकारी आणि निमसरकारी कर्ज, आयात वित्तीय अस्थिर वातावरणात केंद्रीय बँकांचे मुद्रा स्थिरतेसाठी हस्तक्षेप तसेच अर्थव्यवस्थेतील आत्मविश्वास वाढवून आपत्कालीन आर्थिक संकटांना तोंड देणे या सर्वांसाठी उपाययोजना म्हणून विदेशी विनिमय व त्याचा साठा याला महत्त्व प्राप्त झाले. बरीच राष्ट्रे साठा वाढवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहेत.
कारण त्यांना त्यांची मुद्रा आंतरराष्ट्रीय मुद्रा म्हणून चलनात आणायची आहे. (उदा : चीन) जे देश निर्यात प्रदानावर जास्त निर्भर असतात, अशा देशांचा आपल्या मुद्रेचे मूल्यांकन कमी करण्यावर जास्त भर असतो, जेणेकरून निर्यात केलेला माल स्वस्त दरात विदेशी ग्राहकाला उपलब्ध होतो. याचा परिणाम निर्यात करणाºया देशावर असा होतो की, त्या देशाच्या मुद्रेचे मूल्यांकन कमी झाल्यामुळे तेथील राष्ट्रीय वित्तीय गुंतवणूक विदेशी गुंतवणुकीस आकर्षित करते. एका ठरावीक काळानंतर आयात महागते. त्या वेळी केंद्रीय बँक विदेशी विनिमय साठा वापरून स्वराष्ट्राचे मुद्रांकन वाढवते.