आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - अपुरा पाऊस, विकासाचा मंदावलेला वेग आणि चढे व्याजदर अशा नकारात्मक वातावरणातही विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून भांडवल बाजारात येणारा निधीचा ओघ आटलेला नाही. उलट या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत विदेशातील गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात तब्बल 10 हजार कोटी रुपयांचे भारतीय समभाग विकत घेतले आहेत. विशेष म्हणजे गेल्या पाच महिन्यांमध्ये पहिल्यांदाच जुलै महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर विदेशी निधीची गंगाजळी बाजारात आली आहे.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी आढावा महिन्यामध्ये एकूण 49,557 कोटी रुपयांची ढोबळ समभाग खरेदी तर 39,285 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. परिणामी या गुंतवणूकदारांनी एकूण 10 हजार 273 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक भांडवल बाजारात केली असल्याचे बाजार नियंत्रक सेबीकडे उपलब्ध असलेली आकडेवारी सांगते. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यापासून विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी केलेली ही सर्वाधिक निव्वळ गुंतवणूक आहे.
पावसाची ओढ, घटलेला विकासदर चिंताजनक असला तरी प्रामुख्याने जागतिक पातळीवरील विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भांडवल बाजारात मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणुकीचा ओघ येत असल्याचे मत डेस्टिमनी सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक सुदीप बंदोपाध्याय यांनी व्यक्त केले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गेल्या महिन्यात कर्ज बाजारपेठेत 3,392 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ताज्या आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी आतापर्यंत 52 हजार 266 कोटी रुपयांची समभाग बाजारपेठेत तर 24 हजार 253 कोटी रुपयांची गुंतवणूक कर्ज बाजारपेठेत केली आहे..
सुधारणांच्या अपेक्षेने गुंतवणूक
नव्या सुधारणा राबवण्यासाठी सरकार पावले उचलेल अशी अपेक्षा या गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळेच कमी पाऊस, मंदावलेला विकास आणि चढे व्याजदर या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करीत विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारात खरेदीचा सपाटा कायम सुरू ठेवला असल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. येत्या 8 ऑगस्टपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याअगोदर काही महत्त्वाच्या सुधारणा राबवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल, अशी अपेक्षा या गुंतवणूकदारांना वाटत असल्याचे मत सीएनआय रिसर्चचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किशोर ओस्तवाल यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.