आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दर चार भारतीयांमागे एक जण टाळतो सकाळची न्याहरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील गरीब जनतेला पुरेशा प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध व्हावे या दृष्टीने अन्न सुरक्षा विधेयक आणण्यासाठी लोकसभेत एकीकडे चर्चा सुरू आहे. परंतु केलॉग्ज इंडियाने चार प्रमुख शहरांमध्ये केलेल्या एका पाहणीत दर चार भारतीयांमागे एक जण सकाळची न्याहारीच टाळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्याहारी न केल्यास गंभीर आजार होण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे.

न्याहारी न करण्यामागे अन्य कारणांबरोबरच वजन वाढण्याची भीतीदेखील असते. त्यामुळे आरोग्याबाबतच्या अधिक सजगतेमुळेही न्याहारी टाळण्याचे प्रमाण जास्त आहे. न्याहारी न करण्याचे प्रमाण 27 टक्के असल्याचे मुंबईतल्या निर्मल निकेतन या होम सायन्स कॉलेजने केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे.

निर्मल निकेतन 2009 पासून या विषयावर अभ्यास करीत असून आतापर्यंत मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या शहरांतील 3,619 जणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या अभ्यासात केवळ तीन टक्के जणांनी सकाळी न्याहारी करीत असल्याचे म्हटले आहे.

या संस्थेच्या संशोधन संचालक मालती शिवरामकृष्णन यांच्या म्हणण्यानुसार, जे न्याहारी करतात त्यांच्या न्याहारीत पोषक मूल्यांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे.

जवळपास 72 टक्के जणांच्या न्याहारीमध्ये पोषक मूल्यांचा समावेश नसतो, असेही त्यांनी सांगितले. हे प्रमाण कोलकात्यामध्ये सर्वात जास्त असून त्यापाठोपाठ मुंबई आणि दिल्ली या शहरांचा क्रमांक लागतो. परंतु चेन्नईमध्ये न्याहारीमध्ये पोषक मूल्यांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

न्याहारी टाळण्याचे सर्वाधिक प्रमाण 13 ते 17 वर्षे वयोगटात असून महिलांमध्ये हेच प्रमाण 54 टक्के आहे.

ग्राहकांची नेमकी मानसिकता जाणून घेण्याच्या दृष्टीने आमच्यासाठी ही सर्व निरीक्षणे अत्यंत महत्त्वाची आहेत. परंतु नाष्टा टाळण्याचे वाढते प्रमाण धक्कादायक आहे. कारण दिवसभरात सकाळच्या न्याहारीला खूप महत्त्व असते. सकाळच्या न्याहारीचे महत्त्व ग्राहकांना पटवून देण्याचा प्रयत्न आता आम्ही करणार आहोत, असे केलॉग्ज इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका संगीता पेंडुरकर यांनी सांगितले.


बहुतेकांना हवा ब्रेकफास्टमध्ये पराठा
दिल्लीकरांनी ब्रेकफास्टमध्ये पराठय़ाला सर्वात जास्त पसंती दिली आहे. चेन्नईमधील रहिवासी मात्र इडली आणि डोशावर खुश आहेत. मुंबई आणि कोलकात्यामधील बहुतांश नागरिकांनी न्याहारीमध्ये ब्रेड, दूध, अंडी यांना जास्त महत्त्व दिले आहे.