Home »Business »Industries» Four Wheeler Cars Selling Go Down

चारचाकी मोटारींचा विक्रीचा गिअर डाऊन..

प्रतिनिधी | Jan 10, 2013, 05:48 AM IST

  • चारचाकी मोटारींचा विक्रीचा गिअर डाऊन..

मुंबई - दिवाळीमध्ये चारचाकी मोटारींच्या विक्रीने ‘टॉप गिअर’ टाकला होता. पण सणासुदीचा हंगाम संपताच वाहन उद्योगाचे पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू झाले आहे. चढे व्याजदर, इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि एकूणच अर्थव्यवस्थेने लावलेला मरगळीचा सूर या सगळ्या गोष्टीचा ग्राहकांच्या खरेदीच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात देशातील मोटारींच्या विक्रीत 12.5 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या चार महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण आहे.

सोसायटी आॅफ इंडियन मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नुकत्याच संपलेल्या डिसेंबर महिन्यात 1,41,083 वाहनांची देशात विक्री झाली होती. परंतु त्याअगोदरच्या वर्षातल्या याच महिन्यात 1,61,247 वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षाची तुलना पाहता ही विक्री 12.5 टक्क्यांनी घटली आहे. गेल्या वर्षाच्या आॅगस्टपासून झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. या महिन्यात विक्री 18.5 टक्क्यांनी घटली.

सियामने बदलला विक्रीचा अंदाज
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत देशातील वाहनांची एकूण विक्री मागील वर्षातल्या याच कालावधीच्या तुलनेत 4.57 टक्क्यांनी वाढली आहे. ‘सियाम’ने अगोदर वाहन विक्रीत 1 ते 3 टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु आता हा अंदाज ‘सियाम’ने बदलला असून यंदाच्या आर्थिक वर्षात शून्य ते एक टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत चारचाकी वाहनांची एकूण निर्यातदेखील 2.92 टक्क्यांनी घसरून ती 21,86,834 वाहनांवर आली आहे. केवळ डिसेंबर महिन्यातील निर्यात मात्र 11.17 टक्क्यांनी वाढून ती 2,61,732 वाहनांवर आली आहे.

मोटारसायकल फॉर्मात
दुचाकी उद्योगातील आघाडीच्या हीरो मोटोकॉर्प कंपनीच्या मोटारसायकल विक्रीमध्ये वाढ होऊन ती 4,71,873 मोटारसायकलींवर गेली आहे. प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या बजाज आॅटोची विक्रीदेखील या कालावधीत वाढून 1,98,394 मोटारसायकलींवर गेली आहे. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्रीत 36 टक्क्यांनी वाढ होऊन ती 94,700, तर टीव्हीएस मोटरच्या विक्रीत 15 टक्क्यांनी वाढ दिसून आली .

दिग्गजांना फटका
ह्युंदाई मोटार इंडिया कंपनीने डिसेंबर 2011 मध्ये 29,516 वाहनांची विक्री केली होती. डिसेंबर 2012 मध्ये त्यात 9.55 टक्के घट होऊन विक्री 26,697 वाहनांवर आली.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची वाहन विक्रीची गाडी मात्र 17.68 टक्के वाढीसह सुसाट धावली. कंपनीने डिसेंबर 2011 मध्ये 19,341 वाहनांची विक्री केली होती. गेल्या महिन्यात 22,761 वाहनांची विक्री केली.
फोर्ड इंडिया कंपनीने यंदाच्या डिसेंबरमध्ये वाहन विक्रीत 9.02 टक्के वाढ दर्शवली. डिसेंबर 2011 मध्ये फोर्डने 5978 वाहनांची विक्री केली, तर यंदा 6517 वाहनांची विक्री झाली.
होंडा कार इंडियाने चमकदार कामगिरी नोंदवत विक्रीत चौपट वाढ नोंदवली. डिसेंबर 2011 मध्ये कंपनीच्या 1072 कारची विक्री झाली होती. यंदा 4242 कारची विक्री झाली.
टोयोटा किर्लोस्कर मोटारनेही डिसेंबर 2012 मध्ये 24.31 टक्के वाढीसह चांगली कामगिरी नोंदवली.

Next Article

Recommended