आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीचा तिळगूळ लुटला, सेन्सेक्स 95 अंकांनी वधारला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विदेशी शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण, विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून सातत्याने येत असलेला निधीचा ओघ आणि त्यातच तिस-या तिमाहीमध्ये कंपन्यांची चांगली होत असलेली आर्थिक कामगिरी यामुळे सलग दुस-या दिवशी झालेल्या खरेदीमध्ये सेन्सेक्समध्ये 95 अंकांची वाढ होऊन तो 16,739 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
सकाळी शेअर बाजार उघडल्यापासूनच बाजारात खरेदीचे वातावरण होते. परिणामी खरेदीच्या जोरावर दिवसभरात 16,788.48 आणि 16,611.71 अंकांच्या पातळीत झुलल्यानंतर सेन्सेक्स दिवसअखेर 95.27 अंकांनी वाढून 16,611.71 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 30.20 अंकांनी वाढून 5048.60 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रणी विप्रो कंपनीच्या निव्वळ नफ्यामध्ये डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 10.4 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. परिणामी विप्रोच्या समभाग किमतीत 2.38 टक्क्यांनी वाढ झाली. बजाज आॅटोच्या निव्वळ नफ्यात 19 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे या कंपनीच्या समभागांनीही गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. त्याच्याच जोडीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि आयसीआयसीआयच्या समभागांनीही चांगली कमाई केली; परंतु नफारूपी विक्रीचा आयटीसीच्या समभागांना फटका बसला. महागाईचा दर खाली आल्यापासून विदेशी गुंतवणूकदार संस्था भांडवल बाजारात झपाट्याने खरेदी करीत आहे. मुंबई शेअर बाजाराकडे उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये या गुंतवणूकदारांनी गुरुवारी 626.14 कोटी रुपयांची समभाग खरेदी केली असून यंदाच्या वर्षात त्यांनी जवळपास 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक भांडवल बाजारात केली आहे. रिझर्व्ह बॅँक आपल्या नाणेनिधी धोरण आढाव्यामध्ये व्याजदर कमी करेल अशी आशा बाजाराला आहे.

टॉप गेनर्स
आयसीआयसीआय बँक, जिंदाल स्टील, भेल, हीरो मोटोकॉर्प, स्टेट बँक, विप्रो, एनटीपीसी, डीएलएफ, ओएनजीसी, टाटा पॉवर, सिप्ला, गेल, रिलायन्स.
टॉप लुझर्स
महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, हिंदाल्को, कोल इंडिया, स्टर्लाइट.

विदेशी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण
अमेरिकेतील बँकांनी केलेली भक्कम आर्थिक कामगिरी आणि युरोझोनमधील आर्थिक पेचप्रसंगावर उपाययोजना निघण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आशियाई शेअर बाजारात चांगले वातावरण निर्माण झाले असून त्याचा सकारात्मक परिणामही भांडवल बाजारावर होत असल्याचे मत बाजार विश्लेषकांनी केले आहे. शुक्रवारी हाँगकाँग, सिंगापूर, चीन, दक्षिण कोरिया आणि जपान शेअर बाजार वधारले; परंतु ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स शेअर बाजार घसल्यानंतर युरोप बाजारही दुपारनंतर गडगडला.