आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Germany\'s Izenberg Company Will Start Project In India

जर्मनीच्‍या आयझेनबर्गचा प्रकल्‍प लवकरच भारतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जर्मनीतील बहुराष्‍ट्रीय कंपनी आयझेनबर्ग बाथरूमसाठी वापरले जाणा-या उत्‍पादनाचा प्रकल्‍प भारतात सुरू करणार आहे. युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात व्यवसाय वाढीस मोठा वाव असून येथे उत्पादन प्रकल्प सुरु करण्याची योजना असल्‍याची माहिती कंपनीचे दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख हुझी हुंडेकरी यांनी दिली. इतर कोणत्याही राज्यांच्या तुलनेत नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेत उद्योग व्यवसाय करण्यास पोषक आणि अनुकूल वातावरण असल्‍याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आयझेनबर्ग ही पायाभूत सुविधा उद्योगाला लागणारे सुटे भाग तसेच बाथरूम मध्ये वापरले जाणारी फिटिंग तयार करते. जगातील 24 देशात कंपनीची उत्पादने विकली जातात आणि भारतात ती सध्या आयात केली जातात. कंपनीने मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पुण्यात भारताचे मुख्य कार्यालय स्थापन केले असून पाणी वापराचे वेगवेगळे प्रयोग करण्यास येथे चाचणी आणि संशोधन केंद्र चालू आर्थिक वर्षात स्थापन करण्याचे ठरविले आहे.

चालू आर्थिक वर्षात पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातून 20 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे अशी माहिती देऊन हुंडेकरी म्हणाले, की गेल्या तीन वर्षात एकट्या पुण्याची बाजारपेठ 60 टक्के वाढली असून आमची उलाढाल 9.6 कोटी रुपयांवरून 15 कोटी रुपये झाली आहे. महाराष्ट्र ही आमच्या दृष्टीने सर्वात मोठी बाजार पेठ आहे. आगामी तीन वर्षात उलाढाल 100 कोटी रुपयांवर जाईल अशी अपेक्षा आहे

कच्या मालाची उपलब्धता, उत्पादन खर्च आणि चांगले मनुष्यबळ या तीन निकषांचा विचार करता गुजरातेत उत्पादन प्रकल्प उभारणे आम्हाला अधिक फायदेशीर ठरणार असून स्थानिक टाईल उत्पादकाच्या सहकार्याने तो स्थापन केला जाईल आणि आम्ही त्यासाठी दीड कोटी डॉलर गुंतवणूक करणार आहोत. मोदी सरकारची पारदर्शकता आणि धोरणातील सातत्य हे यामागचे कारण आहे. देशाची एकूण बाजारपेठ 2200 कोटी रुपयांची असून येथे उत्पादन सुरु झाल्यावर निर्यात केली जाणार आहे.

देशातील 21 शहरात वितरक नेमले असून त्यात महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, बारामती या शहरांचा समावेश आहे. सध्या आमच्या हातात 55 कोटी रुपयांच्या ऑर्डर आहेत असेही त्यांनी सांगितले.