आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर्घकालीन भांडवली नफ्यावर मिळवा कर सवलत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तीन वर्षांपूर्वी राजीव यांनी एक जमीन खरेदी केली होती. दरम्यानच्या काळात जमिनीचे भाव वाढले. या गुंतवणुकीवर मिळणा-या चांगल्या परताव्यामुळे राजीव यांनी ती जमीन विकली. त्यातून मिळालेल्या रकमेतून दुसरीकडे जमीन विकत घेतली. मात्र, प्राप्तिकरात दीर्घकालीन भांडवली नफ्यावर (लाँग टर्म गेन) कर सवलतीचा लाभ न मिळाल्यामुळे त्यांना धक्का बसला. करापोटी त्यांना मोठी रक्कम भरावी लागली.


जमीन- घर विक्रीतून मिळणा-या दीर्घकालीन नफ्यावर प्राप्तिकर सवलतीच्या तरतुदीबाबत स्पष्ट माहिती नसल्यास राजीव यांच्याप्रमाणे कर भरावा लागू शकतो. कोणतीही जमीन, घर, संपत्ती विक्रीतून होणा-या नफ्यावर (लाँग टर्म गेन) कर सवलतीचा फायदा मिळू शकतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 54 आणि 54 एफमध्ये तशी तरतूद आहे. त्याविषयी...
कलम 54 : कोणत्याही निवासी घराच्या विक्रीतून होणा-या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर (लाँग टर्म कॅपिटल गेन) या कलमानुसार कर सवलत मिळू शकते. जर एखादे घर, जमीन खरेदी केल्यानंतर तीन वर्षांनी विक्री केल्यास पुढे दिलेल्या पर्यायांत गुंतवणूक करून कर सवलत मिळवता येते.


1. दोन वर्षांच्या आत या रकमेतून घर खरेदी केल्यास किंवा तीन वर्षांच्या आत निवासी घराचे बांधकाम केल्यास सवलत मिळते. तसेच जुने घर विकण्याच्या एक वर्ष आधी नव्या घरासाठी गुंतवणूक केली असल्यास या कलमाअंतर्गत कर लाभ मिळतो.
2. कलम 54 ईसीतील तरतुदीनुसार ही रक्कम एनएचएआय किंवा आरईसीच्या भांडवल वृद्धी रोख्यात गुंतवल्यास कर सवलत मिळते. यात एका वर्षात जास्तीत जास्त 50 लाख रुपये गुंतवता येतात.
3. या दोन्ही पर्यायांत गुंतवणूक शक्य नसल्यास ही रक्कम कॅपिटल गेन्स अकाउंटमध्ये गुंतवल्यास कर सवलतीचा लाभ मिळवता येतो. ही एक प्रकारची मुदत ठेव योजना असून ठरावीक बँकांत उपलब्ध आहे.
54 एफ : निवासी मालमत्ता वगळता इतर सर्व प्रकारच्या मालमत्तेसंदर्भात हे कलम आहे. काही अटीनुसार या कलमांतर्गत कर सवलत मिळवता येते.
1. कलम 54 अंतर्गत असणा-या तरतुदीनुसार लाभ मिळवता येतो. केवळ 54 ईसी बाँडचा यात समावेश नाही.
2. या कलमांतर्गत पूर्ण नफ्यावर सवलत मिळत नाही. सवलतीची रक्कम पुढील सूत्रानुसार ठरते- गुंतवलेली रक्कम गुणिले कॅपिटल गेन / नेट कन्सिडरेशन
3. ही मालमत्ता विकताना विकणा-याकडे सवलत घेतलेल्या मालमत्तेशिवाय केवळ एकच मालमत्ता असावी, ही अट या कलमाला वेगळे बनवते. कलम 54 अंतर्गत कितीही मालमत्ता असल्या तरी चालतात.
या दोन्ही कलमांनुसार नवी मालमत्ता खरेदी केल्यानंतर किंंवा बांधल्यानंतर तीन वर्षांच्या आत ती विकता येत नाही. तीन वर्षांच्या आत विक्री केल्यास कर सवलतीची रक्कम कमी होते किंवा पूर्ण करपात्र ठरते.
या दोन्ही कलमांत अत्यंत कायदेशीर बाबींचा समावेश आहे. त्यामुळे त्यातील शब्दन् शब्द काळजीपूर्वक वाचा व त्याचा अर्थ समजून घ्या. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या चांगल्या सल्लागाराची (सीए, कायदेतज्ज्ञ) मदत अवश्य घ्या.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.