आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांत पीएफ पडणार हातात; एक जुलैपासून ऑनलाइन सुविधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) ट्रान्सफर करणे तसेच काढणे आता अधिक सुलभ होणार आहे. पीएफसंबंधीचे सर्व प्रकारचे दावे तीन दिवसांत निपटण्याबाबतच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) तयारीला वेग आला आहे. येत्या पाच जुलै रोजी संघटनेची यासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार असून तीत याबाबत निर्णय होणार आहे. याचा लाभ वर्षाकाठी दावा करणा-या एक कोटी कर्मचा-यांना होईल.

सर्व प्रकारच्या दाव्यांचा निपटारा जलद गतीने करण्याच्या दृष्टीने ईपीएफओने ही योजना तयार केली आहे. विभागीय प्रमुखांच्या पाच जुलै रोजी होणा-या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. यंदाच्या आर्थिक वर्षात 1.2 कोटी दावे दाखल होतील, असा ईपीएफओचा अंदाज असून यापैकी 70 टक्के दाव्यांचा निपटारा तीन दिवसांत करता येईल, असे ईपीएफओला वाटते. असे झाले तर त्याचा लाभ 84 लाख कर्मचा-यांना होईल. संघटनेची पत सुधारण्यासाठी अशी यंत्रणा कार्यान्वित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे ईपीएफओच्या पत्रकात म्हटले आहे.

मागील आर्थिक वर्षात (2012-13) संघटनेकडे 1.08 कोटी दावे आले होते. मात्र, दाव्यांचा निपटारा 30 दिवसांच्या आत न झाल्यामुळे 12.62 लाख दावेकरी असमाधानी होते. यापैकी 1.41 लाख दाव्यांचा निपटारा 90 दिवसांतही झाला नाही. यामुळे ईपीएफओच्या प्रतिमेला तडा गेल्याचे संघटनेच्या निर्देशात नमूद आहे.

सध्या दाव्याच्या निपटा-यासाठी जास्तीत जास्त 30 दिवसांची मुदत आहे. एक महिन्यात दावा निपटण्याची मानसिकता बहलणे ग्राहकांना अपेक्षित आहे. संगणकाच्या युगात कर्मचा-याच्या पीएफचे पैसे काढण्यासाठी तीन दिवसांपेक्षा जास्त काळ लागू नये, असे ईपीएफओने म्हटले आहे.

एक जुलैपासून ऑनलाइन सुविधा
कर्मचा-यांच्या सोयीसाठी ईपीएफओने एक जुलैपासून फंड ट्रान्सफर आणि पैसे काढणे या सुविधा ऑनलाइन देणार आहेत. तसेच एक केंद्रीय तक्रार निवारण कक्षही 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार असून याद्वारे कर्मचा-यांना ऑनलाइन दावे दाखल करण्याची सोय मिळणार आहे. पीएफ खात्याची ऑनलाइन पाहणीही करता येणार आहे. नव्या प्रणालीनुसार पीएफ खात्याचे वैधता प्रमाणीकरण ईफीएफओकडून होणार आहे. सध्या पीएफ खाते वैधतेसाठी कर्मचा-याला नियोक्त्याकडून अर्ज दाखल करावे लागतात.

प्रलंबित दाव्यांसाठी मोहीम
प्रलंबित दावे निकालात काढण्यासाठी ईफीएफओने खास मोहीम हाती घेतली आहे. यात 15 जूनपूर्वी दाखल करण्यात आलेल्या दाव्यांचा विचार होणार आहे. ईपीएफओकडे 11 जूनअखेर 5,38,704 दावे प्रलंबित आहेत.

ईपीएफओचा आलेख
5 लाख कोटी रुपये व्यवस्थापन निधी
5 कोटी वर्गणीदार
(कर्मचा-यांची संख्या )