आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Loan Five Thousand To Five Billion Dollar Fred Hochberg

पाच हजार ते कमाल पाच अब्ज डॉलरपर्यंतचे कर्ज देऊ - फ्रेड होकबर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘आम्ही कमीत कमी पाच हजार ते कमाल पाच अब्ज डॉलरपर्यंतचे कर्ज देऊ शकतो. जे उद्योग अमेरिकेत रोजगार निर्माण करतील अशा छोट्या आणि मध्यम उद्योगांना या कर्ज सुविधांचा लाभ घेता येईल,’ असे आवाहन अमेरिकेच्या आयात-निर्यात बँकेचे अध्यक्ष फ्रेड होकबर्ग यांनी पुण्यात केले. ‘भारत-अमेरिका व्यापार संबंध अत्यंत दृढ पायावर उभे असून एखाद्या घटनेचा त्यावर परिणाम होणार नाही,’ असेही त्यांनी ‘देवयानी खोब्रागडे’ प्रकरणाचा प्रत्यक्ष उल्लेख न करता स्पष्ट केले.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनातील निर्णय प्रक्रियेत अत्यंत वरिष्ठ दर्जाचे अधिकारी म्हणून गणले जाणारे होकबर्ग शुक्रवारी पुण्यात होते. अमेरिकेच्या भारतातील राजदूत नान्सी पॉवेल यांनी मला पुण्याला जरूर भेट द्या, असे सुचवले होते. शिक्षण, उत्पादन आणि वाहन उद्योग ही येथील बलस्थाने आहेत. भारतातील मध्यमवर्गाची लोकसंख्या म्हणजे अमेरिकेची लोकसंख्या आहे. यावरूनच या देशात व्यवसाय वाढीस किती वाव आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा, बांधकाम यंत्रणा, वैद्यकीय तंत्रज्ञान, विमान वाहतूक, अणुऊर्जा, इंधन या क्षेत्रांत निर्यात करणा-या व अमेरिकेत रोजगारनिर्मिती करणा-या भारतीय कंपन्यांना कर्ज देण्यास उत्सुक असल्याचे होकबर्ग यांनी सांगितले.
इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स, वर्ल्ड ट्रेड सेंटर यांनी व्यवसाय संधी जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शैलेंद्र पोरवाल म्हणाले, की गेल्या दहा वर्षांत अमेरिकेतील 870 बहुराष्ट्रीय उद्योगांनी त्यांचे संशोधन-विकास केंद्र भारतात स्थापन केले. तयार अन्नपदार्थ, उत्पादन उद्योग, ऊर्जा, दूरसंचार यात नवनव्या संधी निर्माण होत आहेत. केंद्रात कोणतेही सरकार आले तरी भारत-अमेरिका सहकार्य वाढतच राहणार यात शंका नाही.
ऊर्जा क्षेत्राला भरीव कर्ज
रिलायन्स इंडस्ट्रीला दोन अब्ज डॉलर कर्ज केवळ चार ते पाच टक्के व्याजदराने दिले. ऊर्जा क्षेत्रासाठी अंबानींच्या कंपनीला अर्थसाह्य केले. यातून गुजरातेत जामनगरच्या प्रकल्पात 40 हजार लोकांना रोजगार संधी मिळतील. नुकतीच आम्ही न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनसोबत बोलणी केली असून वेस्टिंग हाऊस आणि त्यांच्यातील देवाणघेवाणीस कर्ज देणार आहोत. सौर ऊर्जा तंत्रज्ञानासाठी 30 कोटी डॉलर कर्ज दिल्याचे होकबर्ग यांनी सांगितले.
भारताचा वाटा अधिक
अमेरिकेतून होणारी निर्यात 2014 अखेर दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ओबामांनी ठेवले आहे. हे गाठण्यासाठी भारतासारख्या विकसनशील देशांची मोठी मदत होणार आहे. भारताचा आमच्या व्यापारातील हिस्सा चार ते पाच पट अधिक राहील, असा अंदाज आहे. भारतीयांचे आमच्या दृष्टीने किती महत्त्व आहे, हे सत्या नाडेला आणि इंद्रा नुयी यांच्या योगदानावरून लक्षात येते. भारतातील निवडणुकांमुळे पतपुरवठा ‘जैसे थे’ राहील. त्यानंतर मात्र वाढ अपेक्षित आहे.
फ्रेड होकबर्ग