आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअरमध्ये द्या स्वत:च्या वाढीला प्राधान्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबात आपल्या मुलाने एक चांगली आणि कायमस्वरूपाची नोकरी शोधावी, असा पालकांचा सल्ला असतो. स्वातंत्र्यानंतरची काही दशके सरकारी नोकरी आदर्श मानली जायची. त्यानंतरच्या काळात सार्वजनिक उपक्रमातील विशेषकरून बँका तसेच विमा कंपन्यांतील नोकरीला स्थायी स्वरूप प्राप्त झाले. गेल्या दोन-तीन दशकात पुन्हा कल बदलला असून खासगी क्षेत्रांतील नोक-यांना दर्जा मिळू लागला. स्थायित्व आणि करिअरमधील संधीच्या दृष्टीने अलीकडे आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नोक-यांना पर्याय मानले जात आहे. अशा नोक-या आकर्षणाचे केंद्र बनल्या असल्या तरी अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल झाले आहेत. आता स्थायी हा निकष कुचकामी ठरतो आहे. सरकारी नोक-या अत्यंत सुरक्षित असल्या तरी करिअर वृद्धीच्या संधी या क्षेत्रात अत्यंत कमी आहेत. तसेच त्यांची संख्याही मर्यादित आहे. अशात खासगी क्षेत्रात मात्र करिअर वाढीच्या आणि नोकरीच्या अमाप संधी आहेत.

खासगी क्षेत्रातील कंपन्या यशस्वीही ठरू शकतात किंवा अयशस्वी होऊ शकतात. समजा अयशस्वी झाली तर नोकरीवर गदा येणारच. म्हणजेच आपण समजतो तेवढे या नोक-या सुरक्षित नाहीत. किंगफिशर एअरलाइन्सच्या बाबतीत काय झाले, याचा विचार करा. अशा विमान वाहतूक कंपनीची नोकरी 5 ते 10 वर्षांपूर्वी आकर्षक होती. मात्र, तोट्याच्या भोव-यात अडकलेल्या किंगफिशरच्या अनेक पायलट तसेच क्रू सदस्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. नोकर कपात झाली नाही तरी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागते. अलीकडेच ऑटो, इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट आणि बांधकाम, मीडिया आणि इतर क्षेत्रांतील कर्मचा-यांची कपात झाली आहे.


या उद्योगातील नोकर कपातीची अनेक कारणे आहेत : कंपन्या तोट्यात येणे (एअरलाइन्स), बाजारातील बदलत्या स्थितीमुळे कंपन्यांना अनुकूल वातावरण नसणे (म्युच्युअल फंड कंपन्या, ब्रोकरेज आदी.), आर्थिक सुस्ती (ऑटो उद्योग), स्पर्धा नसल्याने आयातीत नुकसान (चीनकडून आयात) यांचा समावेश आहे. याशिवाय नफ्यात असणा-या कंपन्यांतही कपात होऊ शकते. कारण कंपनीच्या व्यवस्थापनाची नजर नेहमी खर्च कमी करण्यावर असते. बाजारावर आधारित अर्थव्यवस्थेच्या स्थितीमुळे अशा नोक-यात जॉब सिक्युरिटी नसते. याचाच अर्थ असा की, नोकरीच्या मैदानात टिकून राहायचे असेल तर जॉब मार्केटमध्ये घडणा-या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आपली नोकरी धोक्यात तर नाही ना, हे लक्षात घेण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना :
1. आपल्याप्रमाणे काम करणा-या आपल्या समकक्ष सहका-यांपेक्षा आपली पगार जास्त आहे का ते पाहा. असे असेल तर आपली नोकरी धोक्यात आहे असे समजा. पुढील वेळी तुम्हाला नोकरी सोडण्यास सांगण्यात येऊ शकते.
2. आपण योग्य क्षेत्रातच आहोत की नाही ते लक्षात घ्या. प्रत्येक क्षेत्राच तेजी-मदीचे चक्र असते. उदाहरणार्थ सध्या ऑटो आणि विमान वाहतूक क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. समजा तुम्ही या क्षेत्रात असाल तर नोकरी धोक्यात आहे असे समजा. संगणक आणि आयटी क्षेत्रातील कंपन्या तुलनेत जास्त स्थिर आहेत.
3. आपली नोकरी जास्त जबाबदारीची आहे की कमी जबाबदारीची आहे, हे लक्षात घ्या. समजा तुमच्या पदासाठी जास्त कौशल्य लागते आणि विशेष ज्ञानाची गरज असते, तर तुमची नोकरी जास्त सुरक्षितच आहे, असे समजावे. समजा कौशल्य सहज उपलब्ध असेल तर कौशल्यवृद्धी करणे अत्यंत आवश्यक आहे.
4. आपण जी नोकरी करतो ती सकारात्मक आणि नकारात्मकही असू शकते. समजा तुमची नोकरी फारशी आकर्षक नाही, मात्र महत्त्वाची आहे, तर आपण सुरक्षित आहेत असे समजा. मात्र, अशी नोकरी न सोडल्यास आपल्याला पदोन्नती न मिळण्याची शक्यता आहे. कंपनीसाठी ही व्यक्ती फारशी उपयुक्त नाही, असाही विचार कंपनी व्यवस्थापन करू शकते. हे सर्व धोक्याचे संकेत आहेत. अशात इतरांच्या तुलनेत आपली वेतनवाढ दीर्घकाळासाठी लांबणीवर पडू शकते.
5. समजा तुमचा बॉस तुमच्या कामाविषयी खोदून खोदून विचारणा करत असेल किंवा पूर्ण दुर्लक्ष करत असेल तर नोकरी धोक्यात किंवा पदावनती ठरलेली आहे असे समजावे. सद्य:स्थितीत सातत्याने शिकत राहणे आणि आपले कौशल्य वाढवत राहणे हा उत्तम उपाय आहे. यालाच नोकरीची खरी हमी मानावे. कंपनीतील वातावरण चांगले असो की वाईट, आपल्या वाढीसाठी सातत्यपूर्ण गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. करिअरच्या प्रारंभापासून ते निवृत्तीपर्यंत एकाच कंपनीत नोकरी करण्याचा जमाना आता गेला, हे लक्षात घ्या.


लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आणि डीएनएचे माजी संपादक आहेत.