आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Global Market, Rupee Determine Share Market Direction

जागतिक बाजार, रुपयावर ठरणार शेअर बाजाराची चाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तवाला सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज व्हायला हवे. सध्या जी स्थिती आहे त्यानुसार शेअर बाजाराची चाल राहणार आहे. बाजार सध्या मंदीच्या पकडीत आहे आणि खालची पातळी गाठण्यास उत्सुक आहे. मागील आठवड्यात अनेक समभागांत मोठी तेजी दिसून आली. मात्र, ही तेजी बाजाराचा मूड बदलवण्यास कारणीभूत ठरू शकली नाही. आता मोठ्या घसरणीनंतर बाजार एक तांत्रिक तेजी दाखवण्याची शक्यता आहे. मात्र, कोणतेही नकारात्मक वृत्त मोठ्या घसरणीला आमंत्रण ठरू शकते.


एचएसबीसी पीएमआय निर्देशांक ऑगस्टमध्ये घटून 48.5 अंकावर आला. हे चिंताजनक आहे. जुलैमध्ये हा निर्देशांक 50.1 अंक होता. पीएमआय 50 पेक्षा जास्त असणे चांगल्या उत्पादनाचे निदर्शक मानले जाते. ऑगस्टमध्ये वाहनांच्या विक्रीतील घसरणीचे काही आश्चर्य नाही. मात्र, जून तिमाहीतील जीडीपी मोठ्या घसरणीसह 4.4 टक्के झाली. ही घसरण अपेक्षेपेक्षा जास्त आहे. यामुळे प्रमुख पतमानांकन संस्थांनी देशाची पत घटण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय वित्तीय तुटीच्या एप्रिल ते जुलैमधील आकडेवारीने चिंतेत भर टाकली. ही तूट 3.41 लाख कोटींपर्यंत पोहोचली असून हे प्रमाण एकूण वित्तीय तुटीच्या लक्ष्याच्या 63 टक्के इतके आहे.


अशा धूसर परिस्थितीत आता शेअर बाजाराच्या तेजीला हवे आहे ठोस कारण. तांत्रिकदृष्ट्या बाजारात अजूनही काही प्रमाणात तेजीची कारणे आहेत. मात्र, मंगळवारी सिरियावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे बाजारात विक्रीचा दबाब वाढला आहे. सिरियावरील हल्ल्याने स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता बाजाराला वाटते आहे. रुपयावर याचा वाईट परिणाम झाला. डॉलरच्या तुलनेत याचे मूल्य 68.27 च्या पातळीपर्यंत खाली आले. एकूणच बाजाराच्या दृष्टीने स्थिती विकट असून हा आठवडाही घसरणीच्या वाटेने जाणारा आहे. अशा स्थितीत जगातील प्रमुख शेअर बाजारातील वातावरण आणि रुपयाचे मूल्य यावर बाजाराची दिशा ठरणार आहे. मूळ स्थिती नकारात्मक असली तरी तांत्रिकदृष्ट्या काही प्रमाणात तेजी उसळण्याचीही शक्यता आहे. मात्र, ही तेजी अल्पकाळ टिकणारी आहे.


निफ्टीला खालच्या दिशेने 5291 ते 5307 या कक्षेत आधार आहे. मात्र, या पातळीवरून उसळी घेतल्यास निफ्टी 5357 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हा निफ्टीसाठी पहिला अडथळाही असेल. मात्र, निफ्टीने तत्काळ आधाराची पातळी ओलांडल्यास त्याला 5266 वर चांगला आधार मिळणार आहे. निफ्टी या पातळीखाली आला तर मंदीची छाया आणखी दाट होण्याची शक्यता आहे. मात्र, यातही 5232 आणि 5112 या पातळीवर निफ्टीला चांगला अडथळा होण्याची शक्यता आहे.


वरच्या दिशेने निफ्टीला 5357 पातळीवर अडथळा होईल. निफ्टीने हा अडथळा पार केल्यास 5427 वर अडथळा आहे. मोठ्या संख्येने या पातळीवर खरेदी झाल्यास तेजीवर फारसा परिणाम होणार नाही. अशात निफ्टीला 5481 पातळीवर अडथळा आहे.


समभागांच्या बाबतीत महिंद्रा अँड महिंद्रा, सीमेन्स लिमिटेड आणि टाटा केमिकल्स चार्टवर उत्तम वाटताहेत. महिंद्रा अँड महिंद्राचा मागील बंद भाव 768 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 781 रुपये आणि स्टॉप लॉस 747 रुपये आहे. सीमेन्स लिमिटेडचा मागील बंद भाव 419.50 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 428 रुपये आणि स्टॉप लॉस 409 रुपये आहे. टाटा केमिकल्सचा मागील बंद भाव 239.35 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 247 रुपये आणि स्टॉप लॉस 231 रुपये आहे. येथे बाजारात खरेदीचे वातावरण असताना ही शिफारस तत्काळ व्यवहारासाठी करण्यात आली आहे. बाजारात घसरण असताना सध्याच्या स्तरावर लाँग पोझिशन टाळावी आणि निर्णयासाठी आधार पातळीवर लक्ष ठेवावे.


लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि
moneyvistas.com चे सीईओ आहेत.