आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्ताईचे ‘सोनेरी’ दिवस; सोने 620 रुपयांनी स्वस्त, चांदी 40 हजारांखाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, नवी दिल्ली, औरंगाबाद - जागतिक बाजारात सोन्याची झळाळी तीन वर्षांच्या नीचांकी पातळीपर्यंत खाली आली. त्याचे पडसाद देशातील सराफा बाजारात उमटले. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 620 रुपयांनी उतरून 26,680 रुपयांवर आले, तर चांदी किलोमागे 1000 रुपयांनी घटून 40,500 झाली. स्थानिक बाजारातील मागणी घटल्याचा फटका या दोन्ही मौल्यवान धातूंना बसला. मुंबई सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 680 रुपयांनी स्वस्त होऊन 26,825 झाले. चांदी किलोमागे 1695 रुपयांनी घसरून 40,475 रुपये झाली.
सोन्याच्या किमतीचा हा एक महिन्याचा नीचांक आहे. 28 मे रोजी सोने या पातळीवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या. तेथे सोन्याने 33 महिन्यांपूर्वीची पातळी गाठली. सिंगापूर बाजारात सोने औंसमागे 2.6 टक्क्यांनी घटून 1244 डॉलर झाली. चांदी औंसमागे 4.5 टक्के घसरून 18.76 डॉलर झाली. चांदी आॅगस्ट 2010 मधील किंमत पातळीपर्यंत खाली घसरली. सराफांनी सांगितले की, लग्नसराईचा हंगाम संपल्याने सोन्याला फारशी मागणी नाही. गुंतवणूकदारांत निरुत्साह आहे. रुपयातील विक्रमी घसरणीचा काहीच फायदा या दोन्ही धातूंना झाला नाही.

सोने घसरणीची कारणे
औरंगाबाद येथील आनंद राठी ब्रोकर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ बोदाडे यांनी अमेरिकेतील घडामोडींमुळे सोने घसरत असल्याचे सांगितले. त्यांनी दिलेली कारणे -
० अमेरिकेतील सकारात्मक आर्थिक संकेतामुळे गुंतवणूकदार सोन्याकडून डॉलरकडे वळले.
० अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉलर तेजीत येऊन सोन्याची मागणी कमी होईल.
० अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने रोखे विक्रीत कपात करण्याच्या निर्णयाने जगभरातील गुंतवणूकदारांत घबराट, त्यामुळे सोन्याची विक्री वाढली.
० गुंतवणूकदारांनी घसरलेल्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढवल्याने सोन्याची मागणी कमी झाली.
चीन फॅक्टर
गोल्डमॅन सॅक्सने चीनचा विकास दर कमी राहण्याचा अंदाज वर्तवला. त्यानंतर बेस मेटल्समध्ये गतीने घसरण झाली. त्याचा परिणाम सोने-चांदीसह सर्व प्रमुख धातूंवर झाला.