आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने स्वस्त, चांदीची चकाकी उतरली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने रोखे खरेदीत हात आखडता घेण्याचे संकेत मागील आठवड्यात दिले. तेव्हापासून सोने, चांदी या मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण सुरू झाली. सोमवारीही घसरण सुरूच राहिली. राजधानीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे 320 रुपयांनी घसरून 27,320 रुपयांवर आले. चांदी किलोमागे 800 रुपयांनी घटून 41,500 रुपये झाली. मुंबई सराफ्यात सोने तोळ्यामागे 300 रुपयांनी स्वस्त होऊन 26,840 वर आले. चांदी किलोमागे 780 रुपयांनी घसरुन 42,220 रुपये झाली.


अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या संकेतांमुळे जगाच्या बाजारात डॉलर वधारला. जगातील प्रमुख शेअर बाजारांत घसरगुंडी दिसून आली. त्याचे पडसाद सोने व चांदीच्या किमतीवर उमटले. सिंगापूर बाजारात सोने प्रतिऔंस 1.4 टक्क्यांनी घसरून 1278.94 डॉलरवर आले. चांदीची किंमत औंसमागे 2.8 टक्क्यांनी घटून 19.55 डॉलर झाली. देशात सध्या लग्नसराई तसेच सणांचा हंगाम नसल्याने या दोन्ही धातूंना फारशी मागणी नसल्याचे सराफा व्यापा-यांनी सांगितले.


मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) बाजारात ऑगस्टच्या वायदे सौद्यात सोने 335 रुपयांनी घसरले. वायदा बाजारात सोने 26,685 रुपये प्रति 10 ग्रॅम या स्तरापर्यंत खाली आले. जगातील बाजारातून मिळणा-या नकारात्मक संकेतांमुळे सटोडियांनी सौदे कापल्याने सोने घसरल्याचे मत बाजारातील जाणकारांनी व्यक्त केले.