आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचे पाऊल: बँकांच्या सोने नाणेविक्रीवर बंदी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोन्याच्या वाढत्या आयातीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने आता आणखी कडक पावले उचलण्याचा विचार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बँकांकडून विक्री होणार्‍या सोन्याच्या नाण्यांच्या विक्रीवर बंदी येण्याचीही शक्यता आहे.

सोने आयात-निर्यातीचा सरकार फेरआढावा घेणार असून त्यामध्ये आयात कमी करण्याच्या दृष्टीने आणखी पावले उचलण्यात येणार आहेत. या उपाययोजनांमध्ये बँकांकडून विक्री होणार्‍या सोन्याच्या नाण्यांचादेखील विचार होण्याची शक्यता आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव अरविंद मायाराम यांनी व्यक्त केली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांच्या नेतृत्वाखालील वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेच्या उपसमितीची बैठक झाल्यानंतर ते बोलत होते. या बैठकीत चिट फंडांसाठी नियमावलीबरोबरच अन्य गोष्टींवरदेखील चर्चा करण्यात आली.

यंदाच्या एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीच्या आयातीत लक्षणीय 138 टक्क्यांची वाढ होऊन ती वर्षभरापूर्वीच्या 3.1 अब्ज डॉलरवरून 7.5 अब्ज डॉलरवर गेली. सोन्याच्या या वाढलेल्या आयातीमुळे वित्तीय तूटदेखील फुगत वार्षिक आधारावर 17.8 अब्ज डॉलरवर गेली आहे. व्यापार तूट वाढण्याचा मोठा ताण पर्यायाने चालू खात्यातील तुटीवर आला आहे. चालू खात्यातील तूट वाढल्यामुळेदेखील सरकारची चिंता वाढली आहे. चालू खात्यातील तूट ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठी जोखीम ठरत असल्याचे रिझर्व्ह बँकेनेदेखील म्हटले आहे.

विदेशी चलनाची आवक आणि जावक यातील फरक असलेली चालू खात्यातील तूट ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत विक्रमी 6.7 टक्क्यांपर्यंत गेली आहे. कच्च्या तेलाबरोबरच सोने आयात हे यामागे प्रमुख कारण आहे. या सोने आयातीला पायबंद घालण्यासाठी बँकांकडून होणार्‍या सोने आयातीवर रिझर्व्ह बँकेने गेल्याच महिन्यात निर्बंध घातले होते. त्याचप्रमाणे गोल्ड ईटीएफ युनिट्स तसेच सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात कर्ज देण्यावरदेखील निर्बंध आणले होते. या सगळ्या उपाययोजनांबरोबरच आता बँकांकडून विक्री होणार्‍या सोन्याच्या नाण्यांवर बंदी आणण्याबाबत विचार केला जात आहे.