आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Demand Decreased, World Jewellery Council Report

सोन्याची मागणी आटली,जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालातील निरीक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाच्या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीमध्ये सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. परंतु जुलै ते सप्टेंबर या तिमाहीच्या तुलनेत मात्र पारंपरिक खरेदीचा हंगाम असल्याने सोन्याची मागणी जास्त वाढली असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. सर्वात मुख्य म्हणजे महागाईचा कहर आणि पुरवठ्यातील तुटवडा यामुळे सोन्याची मागणी मागील वर्षातल्या 219.1 टनांच्या तुलनेत यंदा 32 टक्क्यांनी कमी होऊन ती 148.2 टनांवर आली आहे.
चौथ्या तिमाहीत मात्र तिस-या तिमाहीपेक्षा सोन्याला झळाळी येण्याचा अंदाज आहे. मान्सूननंतर ग्रामीण भागातील खर्चाचे वाढलेले प्रमाण, महत्त्वाचे सण आणि विवाहांचे मुहूर्त यामुळे चौथ्या तिमाहीतील सोने खरेदीचा हंगाम जास्त व्यस्त असण्याची शक्यता जागतिक सुवर्ण परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक पी.आर सोमसुंदरम यांनी या अहवालाचे प्रकाशन करताना व्यक्त केली. केंद्र सरकारच्या कडक निर्बंधांमुळे मौल्यवान धातूचा पुरवठा कमी झाला. त्यामुळे मागील आर्थिक वर्षातल्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या सप्ताहात सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
सोन्याच्या आयातीवर केंद्र सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे या तिमाहीतील मागणीवर परिणाम झाला असला तरी देशातील सोन्याची मागणी मंदावत आहे असे नाही. भारताशी व्यापारी संबंध असलेल्या देशांमध्ये सोन्याला असलेल्या मागणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातील काही सोने अवैध मार्गाने देशात परततही असेल. अनेक वर्षे असे प्रकार थांबले होते. गेल्या काही तिमाहींमध्ये अशा प्रकारांनी पुन्हा एकदा जोर पकडल्याचे दिसून आल्याकडे जागतिक सुवर्ण परिषदेच्या गुंतवणूक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मार्कस ग्रब यांन लक्ष वेधले.
सोने मागणी पुरवठ्याचे गणित
० तिस-या तिमाहीत सोन्याला असलेली मागणी 869 टन इतकी नोंदवली गेलेली आहे . मागील आर्थिक वर्षातल्या तिस-या तिमाहीच्या तुलनेत ती 21 टक्क्यांनी कमी आहे. स्थानिक बाजारपेठेत केंद्र सरकारच्या कडक उपाययोजना आणि ईटीएफ गुंतवणुकीमध्ये वार्षिक तत्त्वावर झालेल्या पडझडीमुळे ही घट झाली.
० या तिमाहीत दागिन्यांना असलेली जागतिक मागणी 487 टन इतकी नोंदवण्यात आली आहे, जिच्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेतून दागिन्यांना असलेली मागणी 14 टक्क्यांनी वाढली आहे. 2009 मधील तिस-या तिमाहीपासून तिस-या तिमाहीत नोंदवली गेलेली ही दागिन्यांची सर्वोच्च मागणी आहे.
० सोन्याच्या लगडी आणि नाण्यांमधील गुंतवणुकीत वार्षिक तत्त्वावर सहा टक्क्यांनी वाढ होऊन ती 304 टनांवर
० गुंतवणूकदारांनी आपल्या रोखेसंग्रहात बदल करण्याचा निर्णय घेतल्याने गोल्ड ईटीएफमधून 119 टन निव्वळ सोने बाहेर
० मध्यवर्ती बँकांकडून या तिमाहीत 93 टनांची निव्वळ खरेदी झाली. परंतु मागील वर्षातल्या तिस-या तिमाहीच्या तुलनेत त्यात 17 टक्क्यांनी घट झाली आहे.
अहवालातील वैशिष्ट्ये
० चीनमधून सोन्याला असलेली सातत्यपूर्ण मागणी.
० चालू आर्थिक वर्षाच्या तिस-या तिमाहीत ग्राहकांची एकूण सोन्याची मागणी 210 टन इतकी नोंदवण्यात आली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील कामगिरीच्या तुलनेत या मागणीत 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
० आग्नेय आशियातील मागणीतही वाढ : कमी आधारभूत किंमत असूनही गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत हाँगकाँगमधील मागणीत 28 टक्क्यांनी, व्हिएतनाममधील मागणीत 14 टक्क्यांनी, थायलंडमधील मागणीत 57 टक्क्यांनी आणि इंडोनेशियामधील मागणीत 19 टक्क्यांनी वाढ झाली.
० गेल्या वर्षीच्या तुलनेत तिस-या तिमाहीतील मध्यपूर्वेतील मागणीत 9 टक्के वाढ तर अमेरिकेतील मागणीत 14 टक्के वाढ झाली.