आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Slashes Import Tariff Value On Gold, Silver

सोने-चांदीसाठी खडतर वर्ष; सोने घसरले, रुपयाची आपटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नव्या वर्षाचा पहिला दिवस मौल्यवान धातू आणि रुपयासाठी घसरणीचा ठरला. गेल्या वर्षात मौल्यवान धातूंची चकाकी बरीच फिकी पडली. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोने तोळ्यामागे १०० रुपयांनी घटून २७,१०० वर आले. चांदी किलोमागे ८०० रुपयांनी घसरून ३६,२०० झाली. तिकडे विदेशी मुद्राविनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ३२ पैशांनी आपटून ६३.३५ वर आला. सरलेल्या वर्षात सोने १० टक्के तर चांदी १५ टक्क्यांनी घसरली.

सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक कल आणि देशातील ज्वेलर्स व रिटेलर्सकडून घटलेली मागणी याचा दबाव मौल्यवान धातूंच्या किमतीवर दिसून आला. न्यूयॉर्क सराफा बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) १.४ टक्क्यांनी घटून ११८४.१० डॉलरपर्यंत घसरले.

रुपयाची आपटी
आयातदार आणि काही बँकांकडून डॉलरला चांगली मागणी आल्याने बुधवारी रुपयाचे मूल्य घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया ३२ पैशाने घसरून ६३.३५ वर आला. गेल्या वर्षभरात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ३५ पैशाने कमी झाले.

सोने १० टक्क्यांनी घसरले
सरलेले वर्ष सोन्यासाठी अत्यंत खडतर ठरले. वर्षभरात सोन्याची किमत तोळ्यामागे २,६६० रुपयांनी घटून २७,२०० वर आली. गेल्या वर्षात (२०१४) सोने १० टक्क्यांनी घसरले. चांदीबाबतही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. चांदीची किंमत किलोमागे ४३,७५५ रुपयांवरून ३७,००० रुपयांपर्यंत खाली आली. ही घट १५ टक्के आहे.

सोने आयातीत २५ टनांची घट
सोन्याची आयात कमी होण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने नव्याने कोणतीही बंधने लादलेली नसताना चालू महिन्यात सोन्याच्या आयातीत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात संपूर्ण नोव्हेंबरच्या तुलनेत सोन्याच्या आयातीत २५ टनांची घट नोंदविण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये सोन्याची आयात १५० टनांवर गेली होती. डिसेंबर २०१३ मध्ये सोन्याची आयात ३० टन नोंदवण्यात आली. २८ नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या आयातीसंदर्भात लागू केलेली ८०:२० ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या वाढत्या आयातीवर बंधने घालण्यासाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय तत्कालीन केंद्र सरकारने घेतला होता. सोन्याच्या आयातीत होणार्या वाढीमुळे चालू खात्यातील तूट वाढत होती.