आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने आयातीला वेसण घालणार; लवकरच सरकारकडून ठोस उपाययोजना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोन्याच्या आयातीला आणखी वेसण घालण्यासाठी रिझर्व्ह बॅँक आणि संबंधित मंत्रालयांनी आणखी ठोस उपाययोजना हाती घेण्याचा विचार असल्याचे वाणिज्यमंत्री एस. आर. राव यांनी सांगितले.
वाढती व्यापार तूट ही सरकारसाठी चिंतेचा विषय ठरली आहे, पण या हाती घेण्यात येणार्‍या उपाययोजनांमध्ये रिझर्व्ह बॅँक, वित्त मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय यांचा समावेश आहे. सोने आयात आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने काय करता येऊ शकेल याबाबत सध्या सल्लामसलत सुरू आहे, अशी माहिती राव यांनी ‘असोचेम’ने आयोजित केलेल्या एका समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. बँकांकडून होणार्‍या सोने आयातीवर रिझर्व्ह बॅँकेने अगोदरच काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आता यापुढे आणखी कोणती पावले उचलता येऊ शकतात हे तपासून बघितले जात असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.
मौल्यवान पिवळ्या धातूच्या वाढत्या आयातीमुळे चालू खात्यातील तुटीवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत असून त्यादृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याचे संकेत सरकारने सोमवारी दिले होते. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय स्थिरता विकास परिषदेच्या बैठकीत अलीकडच्या काही महिन्यात सोन्याच्या आयातीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव अरविंद मायाराम यांनीदेखील सोने आयातीला लगाम घालण्यासाठी सरकार आणखी ठोस पावले उचलणार असल्याचे संकेत दिले होेते.

रिझर्व्ह बँकेने आवळला निर्बंधांचा फास
चालू खात्यातील वाढत्या तुटीला लगाम घालण्याच्या दृष्टीने मौल्यवान धातूची मागणी कमी करण्यासाठी बँकांबरोबरच आता अन्य संस्थांच्या सोने आयातीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशामध्ये सर्व नामनिर्देशित संस्था, प्रीमियर आणि स्टार ट्रेडिंग हाऊससाठी असलेल्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार नामनिर्देशित संस्था आणि बँकांकडून माल पाठवणी आधारावर करण्यात येणार्‍या सोन्याच्या आयातीला केवळ सोने अलंकार आयातदारांच्या गरजांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने परवानगी देण्यात आली आहे. या निर्बंधांची अंमलबजावणी तत्काळ करण्यात आली आहे. या अगोदर 13 मे रोजी बँकांवर अशाच प्रकारचे निर्बंध घालण्यात आले होते.

सध्याच्या उपाययोजना
सोन्यावरील आयात शुल्कात वाढ, मौल्यवान धातूची आयात करण्यासाठी बँकांवर बंधने, गोल्ड ईटीएफ युनिट किंवा सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात कर्ज देण्यास बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना मनाई.

सोने तेजीत
नवी दिल्ली- सरकार सोने आयातीला आळा बसवण्यासाठी पावले उचलत असताना राजधानीतील सराफ्यात सोने तेजीने झळाळले. सोन्याच्या किमती तोळ्यामागे 245 रुपयांनी वाढून 27,670 रुपये झाल्या. चांदीच्या किमती किलोमागे 300 रुपयांनी वाढून 44,800 रुपयांवर स्थिरावल्या.