आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने आयात 41 टक्क्यांनी घटणार;एमएमटीसीचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चालू आर्थिक वर्षात सोन्याची आयात 41 टक्क्यांनी घटणार असल्याची शक्यता एमएमटीसीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

आयातीचे प्रमाण घटल्याने 2013-14 या आर्थिक वर्षात 500 टन सोन्याची आयात होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी हा आकडा 850 टन इतका होता, असे एमएमटीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. एस. धेशी यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्येच जवळपास 400 टन सोन्याची आयात झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यात आणखी 100 टन सोन्याच्या आयातीची भर पडणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

सोन्याच्या आयातीवर सरकारने लावलेल्या निर्बंधांमुळे त्याचे प्रमाण यंदा घटले आहे. जागतिक बाजाराच्या तुलनेत देशांतर्गत बाजारातील चढे भाव आणि मोठ्या प्रमाणावर मागणी ही त्याची कारणे असल्याचे धेशी म्हणाले. स्थानिक बाजारात विक्री करण्यासाठी कमी सोन्याची आयात करण्यात येणार असली तरी निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आयात वाढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या 2200 किलोच्या तुलनेत यंदा 3000 किलो सोने निर्यातीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सोन्याच्या आयातीवर निर्बंध असून त्यात आणखी वाढ करण्याची गरज नसल्याचेही धेशी यांनी स्पष्ट केले. सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 8 टक्क्यांवरून 10 टक्के केले असून आयात केलेल्या सोन्यापैकी 20 टक्के सोन्याची निर्यात करण्याचे बंधनही घातले आहे.