आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णदेवा, पाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकार आणि आरबीआय सरसावले सुवर्ण आयात कमी करण्यासाठी :
‘सोने’ आम्हा भारतीयांचा चिरंतन हव्यासाचा विषय असून अतिगरीब ते थेट अतिश्रीमंतांपर्यंत सर्वांना सोने घालावे, मिरवावे, साचवावे याचे वेड आहे. या वेडापायी सोने आयातीत भारताचा पहिला क्रमांक जगात लागतो आणि त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होऊन चालू खात्यातील तूट वाढत आहे. यामुळेच सरकारने सोने आयातीवर निर्बंध वाढवले आहेत, तरीही 30 जून 2013 अखेरच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आपण 567 टन सोने आयात केले आहे. मागील वर्षी आपली हीच आयात 62 अब्ज डॉलर्सची होती. सोने आयातीमुळे आपल्या जगण्यावर वाईट परिणाम होत असून आता अतिच झाले म्हणून मग सरकार आणि रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया रास्तपणे सुवर्ण आयात कमी करण्यासाठी सरसावले आहे.
देवस्थानांना सोने चलनात आणण्याचे आवाहन, देशातील मंदिरात किमान दोन हजार टन सोने :
याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मनमोहनसिंग आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देवस्थानांना सोने चलनात आणण्याचे आवाहन केले आहे. रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाने तर यासंदर्भात देवस्थानांना विचारणा करणारी पत्रे पाठवली, पण यातून काही हाती लागण्याची चिन्हे नाहीत. वास्तविक देवस्थानांकडे अब्जावधीचे सोने व दागिने बंद तिजो-यांत पडून आहेत. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अंदाजानुसार आपल्या देशातील मंंदिरांत किमान दोन हजार टन सोने आहे व ते सातत्याने वाढत आहे. त्याचा हिशेब आणि संरक्षण करण्यासाठीच कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. भक्तजनांना सुवर्णदानाचे मोठेपण व पुण्य पदरी पाडून घेण्याचा मोह मात्र सातत्याने वाढत चालला आहे. तसे म्हटले तर अगदी अणूरेणूत भरलेला देव सोन्यात आहेच. शिवाय भक्तिभावाने देवाला सोने अर्पण करतो ते सोने म्हणजे देवच. आपल्या आजच्या अर्थसंकटावर मात करण्यास ते पावेल हे निश्चित. त्यासाठी त्याला नुसतेच ठेवण्याऐवजी (निम्मे तरी) चलनात मात्र आणले पाहिजे. देऊन टाका, काढून घेऊ असे कोणीही म्हटलेले नाही, तर ‘पडून ठेवू नका’ अशी विनंती सरकारने केली आहे. त्याचा विचार करण्याची गरज आहे.
देवाचे सोने ड्यूटी नसल्याने स्वस्त असेल व भावनेमुळे ते घेण्यास भक्त धाव घेतील :
देवस्थानांनी त्यांचे निम्मे सोने जरी बाजारात विकले तरी काम होईल. एकतर त्यांच्याजवळ पैसा, इच्छा आहे ते सारे हे देवाचे सोने घेण्यास धाव घेतील. त्यावर कस्टम ड्यूटी वगैरे नसल्याने हे सोने थोडे कमी भावातही मिळू शकेल. यातून सोन्याची आयात कमी होईल. याचा परिणाम आयात-निर्यात व्यापारातील तूट कमी करण्यात हाऊ शकेल. दुस-या बाजूला सोने विक्रीतून देवस्थानांकडे प्रत्यक्ष पैसा येईल, ज्याचा वापर ते बदल, दुरुस्ती, सुधारणा, सुशोभीकरण, समाजोपयोगी कामे यासाठी करू शकतील. मोठे निधी आणि रकमा बॅँकेच्या ठेवीत ठेवू शकतील. यामुळे बॅँकांची आजची निधी ताणतणावाची परिस्थिती सुधारेल व त्यांची कर्जे वाटण्याची क्षमता वाढेल. कर्जव्यवहार संख्येने व रकमेने वाढतील. यामुळे रोजगार, उत्पादन त्यातून उत्पन्न, बचत, गुंतवणूक, निर्यात अशी आर्थिक वाढ आकाराला येण्यास चालना मिळेल. आजच्या आर्थिक अरिष्टावर बिनबोभाट मात करण्याची शक्ती, भक्तीने दिलेल्या सोन्यातून देव देईल. यासाठी देवस्थानांच्या विश्वस्त, नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.सध्या तरी रिझर्व्ह बॅँकेला बहुतेक देवस्थानांनी माहिती देण्यासाठी सहकार्य केलेले नाही. वास्तविक आपल्याकडील शिर्डी संस्थान, मुंबईचे सिद्धिविनायक संस्थान व अन्य काही श्रीमंत मंदिरांनी याबाबतीत यापूर्वीच पायंडा पाडला आहे. शिर्डी साईबाबा संस्थानाने तर यापूर्वीच याबाबतीत चांगले उदाहरण घालून दिले आहे. त्यांचे अनुकरण सगळ्याच देवस्थानांनी करायला हरकत नसावी. आपला सुवर्ण खरेदी व संचय, सोने खरेदी-विक्रीतून कमाई याबाबतीतला मोह, लोभ कमी होत नाही. म्हणून मग या जवळच्या उपलब्ध सोन्याच्या वापराचा मार्ग उत्तम आहे. तो अनुसरण्याची बुद्धी सर्वांना देव देवो, ही प्रार्थना देवाकडे करणे उचित होईल.