आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने लवकरच जाणार 29 हजारांवर! नव्या पावलामुळे तेजीचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयात करण्यात येणार्‍या एकूण सोन्यापैकी 20 टक्के सोने निर्यातीसाठी बाजूला काढून ठेवण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे. मध्यवर्ती बँकेच्या या नवीन आदेशामुळे सोन्याच्या किमती महिनाभरात तोळ्यामागे 29 हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पण त्यापूर्वीच मंगळवारी सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 685 रुपयांनी वाढून तो 28,365 रुपयांच्या एका महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे.

चालू खात्यातील वाढलेली तूट कमी करण्यासाठी सरकारने सोमवारी सोने निर्यातीची बंधने आणखी कडक केली आहेत. त्यानुसार नामनिर्देशित बँका किंवा नामनिर्देशित एजन्सी यांना आयातीपैकी 20 टक्के सोने साठवून ठेवावे लागणार
असून 75 टक्के सोन्याची निर्यात केल्यानंतरच आयात करण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे आयात होणारे सोने हे फक्त सराफांनाच उपलब्ध करून देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. परदेशातून सध्या थोडेच सोने बाजारात विक्रीसाठी येत आहे. जर घरगुती किंवा बाजारात वापरण्यासाठीच सोने कमी पडत असेल तर निर्यातीसाठी 20 टक्के म्हणजे 20 किलो सोने बाजूला ठेवले तर ते तसेच पडून राहणार, त्याचा फायदा काय, असे मत बुलियन विश्लेषक अश्विन देरासरी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्बंधानंतर सोमवारी एकाच दिवसात सोने तोळ्यामागे 850 रुपयांनी वाढले. केवळ सोनेच नाही, तर चांदीदेखील दोन हजार रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात सोन्याचा भाव आणखी 1500 रुपयांनी वाढून तो 29 हजार रुपयांवर जाण्याचा अंदाज देरासरी यांनी वर्तवला. एका बाजूला रिझर्व्ह बँकेची 20 टक्क्यांची अट, तर दुसर्‍या बाजुला स्वित्झर्लंडमधील सोने शुद्धीकरण कंपन्यांनी एक ऑगस्टपासून उन्हाळी सुटीचा हंगाम जाहीर केला आहे. त्यामुळे येथील कंपन्यांनी सोने शुद्ध करणे तसेच नवीन ऑर्डर घेणे थांबवले आहे. त्यामुळे सोन्याची आयात आणखी मर्यादित झाली असल्याकडेदेखील त्यांनी लक्ष वेधले.


नेमके निर्बंध काय
चालू खात्यातील वाढलेली तूट कमी करण्यासाठी सरकारने सोमवारी सोने निर्यातीची बंधने आणखी कडक केली आहेत. त्यानुसार नामनिर्देशित बँका किंवा नामनिर्देशित एजन्सी यांना आयातीपैकी 20 टक्के सोने साठवून ठेवावे लागणार असून 75 टक्के सोन्याची निर्यात केल्यानंतरच आयात करण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आयात होणारे सोने हे फक्त सराफांनाच उपलब्ध करून देण्याचे बंधन घालण्यात आले आहे.


रुपयाला बळकटी मिळण्याची शक्यता

गीतांजली समूहाचे एमडी मेहुल चोक्शी यांनी आयात केलेल्या सोन्यापैकी 20 टक्के सोने निर्यातीसाठी बाजूला ठेवण्याचे स्वागत करताना यामुळे चालू खात्यातील तुटीची परिस्थिती सुधारण्याबरोबरच रुपयाला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. दर महिन्याला 3 ते 5 अब्ज डॉलर सोने आयात केले जाते. यापैकी 3 अब्ज डॉलरचे सोने अगोदरच आयात झाले आहे; परंतु रोखीने झालेल्या सोने आयातीचा रुपयाला फटका बसतो. असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.