आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold News In Marathi, Business, Lok Sabha Election

अस्थिर सरकार आल्यास सोन्याचा भाव वधारणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एप्रिल-मे महिन्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर पडण्याची शक्यता एका अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. काठावरचे बहुमत किंवा त्रिशंकू स्थितीमध्ये देशात एक तोळा सोन्याचा भाव 32 हजार रुपयांच्या पुढे सरकण्याची शक्यता आहे, असे असोचेमच्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.


एखादा पक्ष किंवा आघाडीस निर्णायक बहुमत मिळाल्यास गुंतवणूकदार इक्विटी आणि रिअल इस्टेटकडे वळतील. त्यामुळे सोन्याच्या भावात अपेक्षित वाढ होणार नाही. चीनच्या अर्थव्यवस्थेवरून निर्माण झालेली चिंता, अमेरिकी अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि भारतातील निवडणुकीवरून उद्भवलेल्या स्थितीत भारत आणि चीन सोन्याचा क्रमांक एकचा ग्राहक बनण्यासाठी स्पर्धा करत आहेत. दोन्ही देशांमध्ये राजकीय किंवा आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास दोन्हीकडेही सोन्याची मागणी वाढू शकते. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळल्यास वर्षभरात या धातूच्या किमतीत 10 टक्के वाढ होणे अपेक्षित मानले जाते.


स्थिर सरकारच्या स्थितीत शेअर बाजार गुंतवणूकदारांच्या अनुरूप राहील. याचा परिणाम म्हणून रिअल इस्टेट, फायनान्स, ग्राहकोपयोगी वस्तू, दुचाकी आणि पॅसेंजर कार्सची बाजारपेठ उसळी घेईल. या वातावरणात सोन्यातील गुंतवणुकीचा पैसा अन्यत्र वळेल. सरकार अस्थिर राहिल्यास याचा उलटा परिणाम पाहावयास मिळेल, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे, देशात स्थिर सरकार असतानादेखील चीनमधील आर्थिक स्थिती खालावल्यास आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेत सुधारणा न झाल्यास सोन्याची भाववाढ होऊ शकते, असे असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी सांगितले.


500 टन सोन्याची आयात शक्य
जागतिक बाजारपेठेत 1330 ते 1345 डॉलर प्रतिऔंस आहेत. 2013 मध्ये त्यात 29 टक्के घसरण झाली होती. मात्र, यानंतर त्यात सकारात्मक बदल होऊ शकेल. प्रतिऔंस 1000 डॉलरपर्यंत सोन्याचा भाव घसरू शकतो, अशीही एक शक्यता वर्तवली जाते. कस्टम ड्यूटीमधील वाढ आणि विविध निर्बंध असतानादेखील या वर्षी 500 टनापेक्षा जास्त सोने आयात होईल.