आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - सोन्याच्या किमतीतील घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदार चिंतित आहेत. मात्र, या घसरणीमुळे देशाच्या चालू खात्यातील वित्तीय तूट (कॅड) कमी होण्यास मदत होणार आहे. नोमुरा या ब्रोकरेज फर्मच्या ताज्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. तेल आणि सोन्याच्या किमतीतील घसरणीमुळे भारताच्या चालू खात्यातील वित्तीय तूट एक टक्क्याने घटून 4.3 टक्क्यांवर येऊ शकते असे नोमुराने म्हटले आहे.
नोमुराच्या अहवालानुसार, सोने आणि चांदीच्या किमती सध्याच्या खालच्या पातळीवर स्थिर राहिल्यास चालू खात्यातील तूट 4.3 टक्के राहू शकते. यापूर्वी नोमुराने 2013 या आर्थिक वर्षात चालू खात्यातील वित्तीय तूट 5.3 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. असे असले तरी चालू खात्यातील वित्तीय तुटीचे प्रमाण चिंताजनक असल्याकडे नोमुराने लक्ष वेधले आहे.
विशेष म्हणजे, 2012 -13 या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीअखेर चालू खात्यातील वित्तीय तूट 6.7 टक्क्यांच्या पातळीपर्यंत वाढली होती. सरकारसाठी ही चिंतेची बाब होती कारण 2012-13 या आर्थिक वर्षात ही तूट 5 टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची चिंता होती. गेल्या पंधरवड्यात सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कारण या दोन कमोडिटीमुळे आयातीचे आकड्यांत घट येईल. नोमुराच्या मते, या घसरणीचा सर्वाधिक लाभ भारताला झाला आहे. यामुळे घाऊक महागाई दरातही घट येण्याची शक्यता आहे. त्यातून चालू खात्यातील तूट कमी होईल आणि सरकारकडून खते आणि पेट्रोलियम पदार्थांवर देण्यात येणा-या अनुदानाचे बिल कमी होईल. यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळणार आहे. सोने आयात 8 अब्ज डॉलरने कमी होण्याची शक्यता असून कमी प्रमाणात सोने आयात झाल्याचा फायदा होईल असे अहवालात म्हटले आहे. याचप्रमाणे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रतिबॅरल 10 डॉलरपर्यंतच्या घसरणीमुळे तेलाची आयात 9 अब्ज डॉलरने कमी होण्याची शक्यता आहे.
महागाई घटणार
नोमुराच्या अहवालानुसार, सोने आणि कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने आणि स्थिर चलनामुळे उत्पादनासाठी लागणारा खर्च कमी होईल. त्यामुळे घाऊक आधारावरील महागाई दर घटण्याची शक्यता आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेला प्रमुख दरात कपात करण्यास वाव मिळेल. रिझर्व्ह बँक 2013 मध्ये प्रमुख व्याजदरात 0.75 टक्के कपात करू शकते, असे नोमुराला वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.