आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Price Again Touch 28 Thousand Ruppes, Divya Marathi

दिवाळीपर्यंत सोने पुन्हा २८ हजारांवर, सणांमुळे मौल्यवान धातूंच्या मागणीत वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती चढ्या राहण्याची शक्यता आहे. येत्या १५ दिवसांत सोने तोळ्यामागे २८ हजारांची पातळी गाठण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आगामी १५ दिवसांत फक्त सात दिवसच बाजारात व्यवहार होणार आहेत. देशातील सणांचा हंगाम आता सुरू झाला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय जागतिक स्तरावरील आर्थिक आकडेवारी जाहीर झाली असून बाजाराने त्याकडे कानाडोळा केला आहे. यामुळे सोन्याच्या किमती घसरण्याची शक्यता कमी झाली आहे. अमेरिकेतही जीडीपीचे चांगले आकडे आले आहेत.

डॉलरवर नजरा
अमेरिकेत आलेल्या चांगल्या जीडीपी आकड्यांनंतर डॉलर सशक्त होण्याची शक्यता जास्त आहे. परिणामी पुढील आठवड्यात रुपयाची सुरुवात घसरणीने होईल. मात्र, एस अँड पीने भारताचे पतमानांकन स्थिर केल्यामुळे आणि नव्या सरकारच्या सुधारणांमुळे दीर्घकाळाचा विचार केल्यास रुपयात बळकटी दिसून येईल.

मागणी वाढणार
केडिया कमोडिटीचे अजय केडिया यांच्या मते, धनत्रयोदशीपर्यंत सोन्याच्या किमतीत तेजी दिसून येईल. डॉलर इंडेक्समध्ये मोठ्या प्रमाणात करेक्शनची शक्यता आहे, त्यातच सणांचा हंगाम असल्याने मागणी वाढणार आहे.

औरंगाबाद सराफ्यात मागील दहा दिवसांत सोन्याने तोळ्यामागे ४५० रुपयांच्या तेजीसह २७,५०० चा टप्पा ओलांडला आहे. दिवाळीपर्यंत सोने २८ हजारांच्या आसपास असण्याची शक्यता सराफा व्यापा-यांनी व्यक्त केली.

सोने तेजीत
या आठवड्यात सोन्याच्या किमती १.६६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. १९ सप्टेंबर रोजी सोने २६,४९६ रुपये तोळा होते, तर २६ सप्टेंबर रोजी सोने २६,९३५ रुपये तोळा झाले. सप्टेंबरमध्ये प्रथमच तेजी नोंदवली.

डॉलरवर ठेवा लक्ष
आगामी काळात डॉलरच्या मूल्यात तेजी आली तर सोन्यात तेजी येण्याची शक्यता जास्त आहे. ग्राहकांनी डॉलर-रुपया या समीकरणावर लक्ष ठेवून सोने खरेदी करावी.
दत्ता सावंत, उपाध्यक्ष, महाराष्ट्र सराफ सुवर्णकार फेडरेशन