आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने 26,400, पाच दिवसांत 4100 रुपयांची घसरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/औरंगाबाद- देशपातळीवर सोन्याचा भाव सोमवारी तोळ्यामागे आणखी 750 रुपयांची घसरला. मागील दोन दिवसांत 1800 रुपयांची घसरण झाली आहे. दरम्यान, औरंगाबादेत पाडव्यापासून पाच दिवसांत 4,100 रुपयांनी, तर सोमवारी एका दिवसात 1,500 रुपयांनी भाव गडगडले. दिवसअखेर सोने 26,400 वर होते. चांदीही 8 हजारांनी घसरून 46,000 रुपये किलोवर आली. राज्य सराफा फेडरेशनचे उपाध्यक्ष दत्ता सावंत यांनी ही माहिती दिली.


मुळात सोने कधीच स्थिर नसते. दिवसाला त्यात चढ-उतार होतो. मात्र, एका दिवसात हजारांनी घसरण कधीच झालेली नाही. शेअर व डॉलरमध्ये वाढती गुंतवणूक हे यामागचे मूळ कारण आहे. दिल्लीत शुद्ध सोने 27,600 रुपये, तर दागिन्यांचा भाव 25,300 होता. चांदीही किलोमागे 3100 रुपयांनी घसरली असून पाच दिवसांत 6,150 रुपयांनी स्वस्त झाली. याचा फायदा शेअर बाजाराला होत असून गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळले आहेत. सेन्सेक्सने 115 अंकांची उसळी घेतली.

5 कारणे ऐतिहासिक घसरणीची


शेअरमध्ये गुंतवणूक मंदी ओसरल्यानंतर जगभरात सोन्याऐवजी शेअरमध्ये गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे बाजारात सोन्याची आवक प्रचंड वाढली.
सीमा शुल्क वाढले सरकारने सोन्यावर सीमा शुल्क 2 टक्क्यांनी वाढवले. आयात घटली. मात्र, तस्करी वाढल्याने आवक वाढली.
गोल्ड फंडमधून बाहेर तूर्त तरी भाव वाढण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे लोक गोल्ड फंडमधून पैसे काढून घेत आहेत.
अमेरिकेला आव्हान चीन, रशिया आणि मेक्सिकोतील बँकांनी अमेरिकी डॉलरचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी सुवर्ण भांडार वाढवणे सुरू केले. त्यामुळे भाव अनिश्चित.
कर्ज संकट कर्जबाजारी सायप्रस, इटली, ग्रीस व स्पेन हे देश सोन्याचे भांडार खुल्या बाजारात विकण्यासाठी खुले करण्याच्या तयारीत आहेत. सायप्रसकडे 15.5 टन, इटलीकडे 2452 टन, स्पेनकडे 283 टन तर ग्रीसकडे 112 टन सोने आहे. एवढे सोने विकले तर भाव गडगडतील.

तूर्त खरेदी टाळाच
०7 दिवस घसरण शक्य.

०भाव 25 हजारांवर येण्याची शक्यता

०विवाहासाठी खरेदी 3 महिने थांबवलेली बरी

सरकारला मात्र मिळाला थोडा दिलासा

सोन्याच्या भावात होत असलेली घसरण केंद्र सरकारच्या मात्र पथ्यावर पडली आहे. याचे कारण म्हणजे, चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी सरकारने सोन्याची आयात कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. वास्तविक आपण जे सोने भारतीय चलनी रुपये देऊन खरेदी करतो तेच सोने बडे व्यापारी डॉलर देऊन परदेशातून आयात करतात. यामुळे जेवढे सोने भारतात येईल, तेवढे डॉलर देशाबाहेर जातील.