आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याची चमक पडणार फिकी : दिवाळीनंतर सोने २५ हजारांखाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी काही दिवसांत देशातील सराफा बाजारात सोन्याच्या किमती तोळ्यामागे २५ हजारांखाली येऊ शकतात, तर विदेशी बाजाराचा विचार केल्यास कमोडिटी एक्स्चेंज अर्थात कॉमेक्सवर सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) १००० डॉलरच्या पातळीत येण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलणार्‍या समीकरणांमुळे सोन्यात ही घसरण शक्य असल्याचे मत सराफा बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

बहुतांश तज्ज्ञांच्या मते पिवळ्या मौल्यवान धातूतील ही घसरण दिवाळीनंतर दिसून येईल. दिवाळीपर्यंत सोने सध्याच्या पातळीवरून १००० रुपयांपर्यंत तेजी दाखवण्याची शक्यता आहे. सध्या एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्स्चेंज) बाजारात सोने २७ हजार रुपये तोळा या पातळीवर आहे, तर कॉमेक्स बाजारात सोने औंसमागे १२४० डॉलरच्या पातळीवर आहे. कॉमेक्समध्ये सोने ऑक्टोबर २००९ नंतर १००० डॉलरची पातळी गाठण्याची शक्यता आहे. असे झाले तर जून २०१३ प्रमाणे देशातील सराफ्यात सोने तोळ्यामागे २५ हजारांपर्यंत खाली येऊ शकते.

घसरणीचे कारण : युनायटेड किंगडममधून स्कॉटलंड वेगळा होऊन स्वतंत्र देश होण्याची शक्यता बळावली आहे. यूके कोशागारच्या प्रवक्त्यानुसार, सार्वमत कौलात स्कॉटलंड स्वतंत्र देशाच्या वाटेवर गेला, तर लंडनमधून त्यांच्या संपत्तीची वाटणी होणे अटळ आहे. या चर्चेत मुख्यत: १२.६ अब्ज डॉलर मूल्याचे सोने, पौंडरूपी रोख गंगाजळी आणि उत्तर समुद्रातील तेलसाठे यांची वाटणी होइल. या सर्व कारणांमुळे गुंतवणूकदार सोन्याबाबत फारशे आश्वासक नाहीत.

सोने : १२ दिवसांत ३.५%घट
राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत सोने ३.५ टक्क्यांनी घसरले आहे. तोळ्यामागे सोने १००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सोने २८,२०० रुपये होते, शुक्रवारी सोने ३०० रुपयांनी घसरले. या आठवड्यातही सोन्यातील घसरण अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तूर्तास तेजी
सध्या पितृपंधरवडा सुरू असल्यामुळे सोन्याचे भाव घसरलेले आहेत, परंतु सणासुदीच्या काळात मौल्यवान धातूचा भाव २६ हजारांच्या खाली जाणार नाही. पुढच्या महिन्यापर्यंत तो २८,५०० रुपयांच्या वर जाईल. नवरात्र, दसर्‍यापासून सोन्याची मागणी वाढण्यास सुरुवात होईल. त्यातून यंदा पाऊस चांगला झाल्याने ग्रामीण भागातही खरेदीचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कारण तोच सोने खरेदीतील महत्त्वाचा ग्राहक आहे. - अश्विन देरासरी, बुलियन तज्ज्ञ, मुंबई