स्वस्तात सोने खरेदीची / स्वस्तात सोने खरेदीची संधी

Mar 27,2014 05:50:00 AM IST

औरंगाबाद - जगभरातील प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्था रुळावर आल्याची चिन्हे आणि अमेरिका फेडरल रिझर्व्हकडून मिळणारे व्याज दरवाढीचे संकेत यामुळे सराफा बाजारात घसरणीचे वारे घुमू लागले आहे. मार्चमध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 5 ते 7 टक्के घट झाली आहे. मार्चमध्ये 26 दिवसांत सोने तोळ्यामागे 1700 रुपयांनी स्वस्त झाले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या चैत्री पाडव्याला स्वस्तात सोने खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे मत सराफा व्यापार्‍यांनी व्यक्त केले. बुधवारी औरंगाबादेतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 250 रुपयांनी स्वस्त होऊन 29,400 रुपयांवर आले.

सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, लग्नसराई आणि सणांचा हंगाम संपल्याने मागणीअभावी सोने आणि चांदीच्या किमती घटत आहेत. बहुतेक गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक काढून ती शेअर बाजाराकडे वळवत असल्याचा फटकाही मौल्यवान धातूंना बसतो आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे ?
विश्वनाथ बोदाडे, गुंतवणूक सल्लागार, औरंगाबाद
0 आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि आकडेवारीवर बारकाईने लक्ष ठेवावे
0 गुंतवणूकदाराच्या मनात संभ्रम असेल तर वेट अँड वॉच धोरण अवलंबावे.
0 हव्यासापोटी अविवेकी गुंतवणूक टाळावी, आपल्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार पैसा गुंतवावा.
0 एखाद्याकडे मूर्त स्वरूपातील सोने असेल तर त्याने एमसीएक्स कमोडिटीवर हेजिंग करावे, त्यामुळे सोन्याचे मूल्य निश्चित होऊन अधिकचे नुकसान टळेल.
0 योग्य त्या सल्लागाराचा सल्ला घ्यावा. सर्वच घडामोडींवर लक्ष ठेवावे.

चांदीतील घसरणीची कारणे
0 गेल्या दीड वर्षापासून चांदीत घसरणीचा कल आहे. गुंतवणूकदारांचा या शुभ्र धातूवरील विश्वास कमी झाला आहे.
0 औद्योगिक क्षेत्रातून चांदीच्या मागणीत मोठी घट झाली आहे. साठा जास्त असल्याने नजीकच्या काळात मोठय़ा मागणीची आशा नाही.
0 स्थानिक सराफा बाजारात चांदीचे दागिने, गिफ्ट आयटम यांची मागणी घटली आहे. बहुतेक ग्राहक कृत्रिम चायना ज्वेलरी खरेदी करत आहेत.

सोने घसरणीची कारणे
0 अमेरिकेने जगभरातील बाजारांतून दरमहा करण्यात येणारी रोखे खरेदी 75 अब्ज डॉलरवरून 65 अब्ज डॉलरवर आणली आहे.
0 अमेरिका फेडरल रिझर्व्हने पुढील वर्षापासून व्याज दरवाढीचे संकेत दिले आहेत.
0 अमेरिकेतील शेअर बाजारांनी सर्वोच्च् पातळी गाठली आहे. गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक शेअर बाजाराकडे वळवत आहेत.
0 युरोपच्या क्षितिजावरील मंदीचे मळभ दूर झाले असून तेथील शेअर बाजारात तेजीचे वारे घुमू लागले आहे.
0 भारतीय बाजारातही मोदी फॅक्टरमुळे सातत्याने तेजी आहे. येथे गुंतवणूकदारांचा भर शेअर बाजारांकडे आहे.

X