नवी दिल्ली - जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेत आणि देशातील ज्वेलर्स,रिटेलर्सकडून मागणी घटल्याचा फटका शुक्रवारी सोन्याच्या किमतीला बसला. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे ४४० रुपयांनी उतरून २७,०१० वर आले. हा सोन्याचा तीन महिन्यांचा नीचांक आहे. चांदीलाही घसरणीचा फटका बसला. सलग तिस-या सत्रात चांदी किलोमागे १०० रुपयांनी घसरून ४०,९०० झाली. देशात सध्या पितृपक्ष सुरू आहे, त्याचाही परिणाम मौल्यवान धातूंवर झाल्याचे सराफांनी सांगितले.
सराफा व्यापा-यांनी सांगितले, जागतिक बाजारात सोने ८ महिन्यांच्या नीचांकावर आले आहे. त्याचा फटका देशातील सराफा बाजारांना बसला. अमेरिका फेडरल रिझर्व्हने व्याज दरवाढीचे संकेत दिल्यानेही सोन्यावरील दबाव वाढला. लंडन सराफा बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) ०.२ टक्क्यांनी घसरून १२२२.७१ डॉलर झाले. देशातील पितृपक्षाचाही परिणाम मौल्यवान धातूंच्या मागणीवर जाणवत आहे. त्यामुळे सोने घसरून तीन महिन्यांच्या नीचांकावर आले.
चांदीची घसरण : शुक्रवारी सलग तिस-या सत्रात चांदी घसरली. गेल्या तीन सत्रांत चांदी किलोमागे ६०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. शुक्रवारी चांदी किलोमागे १०० रुपयांनी घटून ४०,९०० झाली.
औरंगाबादेत १८ दिवसांत ११०० रुपयांची घसरण
औरंगाबाद सराफा बाजारात एक सप्टेंबर रोजी सोने २८,३०० रुपये तोळा होते. १९ सप्टेंबर रोजी सोने तोळ्यामागे २७,२०० रुपये झाले. गेल्या १८ दिवसांत सोने तोळ्यामागे ११०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
रुपयाची कमाई सुरूच
मौल्यवान धातू एकीकडे घसरत असताना डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य चांगलेच वाढत आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य तीन पैशांनी वधारून ६०.८१ पर्यंत पोहोचले.