आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gold Price News In Marathi, Iraq, Investors, Terrorist, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्याचे दिवस सुरू..., एकाच दिवसात सोने तोळ्यामागे 600 रुपयांनी महागले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/औरंगाबाद - इराकमधील परिस्थिती चिघळल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवला आहे. परिणामी, सोन्याच्या किमती तेजीने झळाळल्या. राजधानी दिल्लीत सोने तोळ्यामागे 605 रुपयांनी वाढून 28,625 झाले. यंदाच्या जानेवारीपासून एका दिवसातील सोन्यातील ही सर्वात मोठी तेजी आहे. या तेजीने सोन्याला नऊ महिन्यांच्या उच्चांकावर नेले आहे. चांदी किलोमागे 1800 रुपयांनी चकाकून 44,900 झाली.

सराफा व्यापा-यांनी सांगितले, इराकमधील अतिरेक्यांच्या कारवाईमुळे स्थिती अत्यंत तणावाची बनली आहे. परिणामी, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदार वळले आहेत. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याने सोन्याची आयात महागली आहे. त्याचाही परिणाम झाला.

औरंगाबादेत सोने 28,900
औरंगाबाद सराफ्यात सोने तोळ्यामागे 500 रुपयांनी वाढून 28,900 रुपये झाले, तर चांदी किलोमागे 700 रुपयांनी चकाकून 45,500 रुपये झाली. आठ दिवसांत सोने तोळ्यामागे 1500 रुपयांनी महागले आहे.

27 ते 28 हजार पातळीत राहणार
इराकमध्ये अचानक झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सोने वाढले. हे हल्ला प्रकरण थांबल्यानंतर सोने पुन्हा पूर्वीच्या पातळीवर येईल, असे वाटले होते; परंतु तसे न होता सोन्याच्या किमती वाढत आहेत. या अगोदर 1990 मध्ये सोन्याच्या किमती 20 टक्क्यांनी घसरल्या होत्या; परंतु आता तसे होणार नाही. सोन्याच्या किमतीत पाच ते सात टक्के घट अपेक्षित असली तरी भाव 27 ते 28 हजारांच्या पातळीतच राहील.
अनिल वाघाडकर, प्रशासकीय संचालक मंडळ, ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन, मुंबई

‘बाय ऑन डीप’चा नियम पाळा
इराकमधील परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. ज्या वेळी सोने स्वस्त झाले होते तेव्हा सोने आणखी स्वस्त होईल असे मानून अनेकांनी खरेदी टाळली होती. मात्र, ही तात्पुरती तेजी आहे. त्यामुळे बाय ऑन डीप अर्थात घसरणीच्या वेळी खरेदी आणि तेजीत विक्री हा नियम लक्षात ठेवून गुंतवणूकदारांनी पावले टाकावीत.
दत्ता सावंत, उपाध्यक्ष राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन, औरंगाबाद

जळगावात सोने 29000 रुपये तोळा
जळगाव सराफ बाजारात चांदी एकाच दिवसात दीड हजाराने वधारल्याने चांगलीच झळाळी लाभली. सोनेही तोळ्यामागे 600 रुपयांनी महागले. जळगाव सराफात गुरुवारी सोन्याचे भाव प्रतितोळा 28 हजार 400 रुपये होते. शुक्रवारी सोने 29,000 रुपये प्रतितोळा झाले. चांदीला गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी मोठी झळाळी आली. गुरुवारी चांदी 45 हजार 500 रुपये किलो होती. शुक्रवारी 1500 रुपयाच्या वाढीने चांदी 47,000 रुपये किलो झाली.