आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने 9 टक्क्यांनी महागणार, गोल्डमॅन सॅक्सचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - सोन्यातील गुंतवणुकीतून दीर्घकाळ सोन्यासारखा परतावा मिळवणार्‍या गुंतवणूकदारांना दिलासादायक वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरणीच्या मार्गावर असलेले सोने आता तेजीने झळाळणार आहे. चालू वर्षात सोन्याचे भाव औंसमागे (28.34 ग्रॅम) 1413 डॉलर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, सध्या सोने 1300 डॉलरच्या घरात आहे. याचाच अर्थ यंदा सोन्याची सरासरी किमत 29400 रुपये प्रतितोळा राहण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बँकिंग क्षेत्रातील दिग्गज गोल्डमॅन सॅक्सने हा अंदाज व्यक्त केला आहे. सोन्यातील सध्याची घसरण तात्पुरती असल्याचे यावरून निष्पन्न होते.

आगामी काळात सोने तेजीच्या झळाळत्या मार्गाने जाणार आहे. असे झाले तर त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर होणे निश्चित आहे, कारण जागतिक बाजारातील संकेतानुसारच भारतीय सराफा बाजाराची वाटचाल चालते. याचाच अर्थ असा की, आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात तेजी आली तर भारतात सोने झळाळते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणार्‍यांना चांगला परतावा मिळवण्याची संधी मिळणार आहे. गोल्डमॅन सॅक्सच्या मते, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून आर्थिक मदतीचे पॅकेज म्हणजेच रोखे खरेदीत कपात करण्याचे कयास लागत असले तरी यात मोठ्या प्रमाणात कपातीची शक्यता नाही. यामुळे सोन्यातील घसरणीचा कल थांबण्यासाठी हे कारण पुरेसे आहे. फेडरल रिझर्व्हची रोखे खरेदी आणि सोन्याच्या किमती यांचे फार जुने नाते आहे. जूनमध्ये फेडरल रिझर्व्हने रोखे खरेदीत कपातीचे संकेत दिल्यानंतर सोन्याच्या किमती एकदम घसरल्या होत्या.


सोने पाच आठवड्यांच्या उच्चंकावर
नवी दिल्ली २ पुरवठा कमी आणि मागणी जास्त याचे प्रत्यंतर शनिवारी सराफा बाजारात आले. सोने तोळ्यामागे 280 रुपयांनी वाढून 28,425 झाले. सोन्याची ही पाच आठवड्यांतील उच्चांकी पातळी आहे. शुक्रवारी सोन्याने 325 रुपयांची कमाई केली होती. चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात सोने आयातीवर नवे निर्बंध घातले होते. त्यानंतर सोन्याचा पुरवठा कमी झाला. त्यामुळे सोने तेजीत आले आहे. चांदी मात्र किलोमागे 120 रुपयांनी घसरून 41,230 झाली.