आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने-चांदी घसरले, रुपया वधारला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली, मुंबई- जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेत आणि देशातील ज्वेलर्स, रिटेलर्सकडून घटलेली मागणी याचा फटका सोने चांदीच्या किमतींना बसला. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे १०० रुपयांनी घसरून २८,३०० झाले. चांदी किलोमागे ६३५ रुपयांनी घटून ३९,४०० झाली. दरम्यान, विदेशी मुद्रा विनिमय बाजारात रुपयाने डॉलरवर मात करत ६१.४१ पर्यंत मजल मारली.
सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले, सोन्याच्या किमतीच्या सध्याच्या पातळीत देशातील ज्वेलर्स, रिटेलर्सकडून मागणीत घट आली आहे, तर ग्रीसमध्ये सत्तांतर झाले असून ग्रीस युरोझाेनमधून बाहेर पडण्याची शक्यता दुणावली आहे. फेडरल रिझर्व्हचीही बैठक होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जागतिक सराफ्यात सोन्याच्या किमतीवर दबाव दिसून आला. सिंगापूर सराफा बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) ०.७ टक्क्यांनी घसरून १२७२.४४ डॉलरवर आले. हा एक आठवड्याचा नीचांंक आहे. देशातील शेअर बाजार तेजीत असल्याने गुंतवणूकदारांनी निधी तिकडे वळवल्याचाही फटका सोन्याच्या किमतीला बसतो आहे.
रुपया वधारला
विदेशीमुद्रा विनिमय बाजारात मंगळवारी चढ-उताराचा खेळ रंगला. शेवटी रुपयाने डॉलरवर मात करत किंचित आघाडी मिळवली. डॉलरच्या तुलनेत रुपया एक पैशाने वधारून ६१.४१ झाला. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात आलेल्या विदेशी निधीमुळे रुपयाला काही प्रमाणात बळ मिळाले.