आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणीअभावी झाकोळली सोन्याची लकाकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- यंदाच्या वर्षात झालेल्या कमी झालेल्या पावसाने सोन्याची लकाकी पार झाकोळली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत सोन्याची मागणी आटली आहे.
जून अखेर संपलेल्या दुस-या तिमाहीत सोन्याची मागणी एकूण वापर 7 टक्क्यांनी किंवा 76 टनांनी कमी होऊन तो मागील वर्षातल्या याच कालावधीतील 1,065.8 टनांवरून 990 टनांवर आला असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे विविध देशांच्या मध्यवर्ती बॅँकांनी विक्रमी सोने खरेदी करून देखील भारत आणि चीनमधील सोने खरेदीचे प्रमाण घटले आहे. गेल्या दोन वर्षातील हे घसरणीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही परिषदेने म्हटले आहे.
जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असतानही भांडवलीसाठा आणि रोख रकमेचा स्त्रोत म्हणून सोन्याकडे पाहण्याचा मूलभूत दृष्टिकोन कायम राहिला आहे. परिणामी विविध देशांच्या मध्यवर्ती बॅँकांनी विक्रमी खरेदी करून आपल्याकडील सोन्याचा साठा वाढवला. या गुंतवणुकीच्या माध्यमातून या बॅँकांनी एका किंवा त्यापेक्षा जास्त परदेशी चलनावरील ताण कमी केल्याचे मत जागतिक सुवर्ण परिषदेच्या गुंतवणूक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक, मार्कस ग्रब यांनी व्यक्त केले.
जागतिक पातळीवरील आव्हानात्मक वातावरणाचा सध्या सोन्याच्या कामगिरीवर परिणाम जाणवत आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील सोन्याच्या मागणीत झालेली घट लक्षात घेता एकूणच जागतिक स्तरावर सोन्याची मागणी घटल्याचे दिसून येत असल्याकडेही ग्रब यांनी लक्ष वेधले.
सोन्याची मागणी प्रतिवर्षानुसार सामान्यपणे स्थिर राहिली. ती गतवर्षीच्या 51.6 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत 51.2 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी राहिली. या तिमाहीत सोन्याची सरासरी किंमत प्रति औंस 1609.49 अमेरिकन डॉलर्स एवढी होती. 2011 सालच्या दुस-या तिमाहीच्या तुलनेत ती 7 टक्के जास्त होती.
गेल्या वर्षातल्या दुस-या तिमाहीत 294.5 टन असलेली सोन्याची देशातील मागणी चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत 181.9 टनांपर्यंत खाली घसरली आहे. दागिन्यांची मागणी देखील 30 टक्क्यांनी घसरून ती 179.5 टनांवरून 124.8 टनांवर आली आहे.