आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यात विक्रमी घसरण, 1250 रुपयांनी स्वस्त!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली- सोन्याचा भाव शनिवारी तोळ्यामागे 1250 रुपयांनी घसरला. परदेशी बाजारातील घसरणीचा फायदा घेत साठेबाजांनी केलेल्या विक्रीमुळे सोने 28,350 रुपयांवर तर चांदी 2500 रुपयांनी घसरून 50,100 रुपये किलोवर आली.
कमोडिटी विश्लेषक आदित्य जैन म्हणाले, अमेरिकी वित्तसंस्था कोसळल्यानंतर जगभरातील शेअर गडगडले तसेच सोने मंदीच्या चक्रात आहे. आगामी काळात घसरणीचा कल कायम राहू शकतो. सोने 26 हजारापर्यंत खाली येऊ शकते.
ग्राहकांना दिलासा : लग्नसराईच्या तोंडावरच सोने घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी तो तात्पुरता असून दोनच दिवस हा कल राहू शकतो. त्यामुळे सोने खरेदीची हीच सुवर्णसंधी असल्याचे मत सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. नंतर सोने 2000 तर चांदी 5 हजार रुपयांनी वधारू शकते, असे मत बुलियन तज्ज्ञ अश्विन देरासरी यांनी व्यक्त केले.
ही तात्पुरती मंदी असून सोने 22 हजार आणि चांदी 45 हजारांपर्यंत घसरण्याची अजिबात शक्यता नाही. असे ठाम मत त्यांनी मांडले.

घसरणीची चार जागतिक कारणे
सायप्रस : गंभीर आर्थिक संकटामुळे या देशाने सुवर्ण भांडार बाजारात विकण्याचे संकेत दिले.
अमेरिका : आर्थिक स्थिती सुधारत आहे. गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजाराकडे.
न्यूयॉर्क एसपीडीआर : या फंड हाऊसने 22 टक्के साठा खुल्या बाजारात विक्री केला.
देशी उद्योग : सरकारने बँकिंगची दारे खासगी क्षेत्रासाठी खुली केली. बडे उद्योग या क्षेत्रात उतरण्यासाठी सोने विकत आहेत.

पुढे काय ?
"अशा स्वरूपाची घसरण तात्पुरती असते. गुंतवणूकदारांनी कुवतीनुसार खरेदी करावी. काही दिवसांत कच्च्या तेलाचे दर वाढतील. नंतर सोन्यात तेजीचे संकेत आहेत.’
विश्वनाथ बोदाडे, व्यवस्थापक, आनंद राठी ब्रोकर्स